शक्त्या निर्मोकतः स्वाद्बहिरहिरिव यः प्रव्रजन्
स्वीयगेहाच्छायां मार्गद्रुमोत्थां पथिक इव मनाक् संश्रयेद्देहसंस्थाम् ।
क्षुत्पर्याप्तं तरुभ्यः पतितफलमयं प्रार्थयेद्भैक्ष्यमन्नं स्वात्मारामं
प्रवेष्टुं स खलु सुखमयं प्रव्रजेद्देहतोऽपि ॥१७॥
अन्वयार्थ-‘ अहिः स्वात् निर्मोकतः शक्त्या बहिः इव यः स्वीयगेहात् प्रव्रजन् मार्गद्रुमोत्थां छायां पथिकः इव मनाक् देहसंस्था संश्रेयेत्-’ ज्याप्रमाणें सर्प मोठ्या शक्तीनें आपल्या काते-(जीर्णत्वचे-) पासून बाहेर निघतो, त्याप्रमाणें पुरुषानें स्वतःच्या घरांतून मोठ्या प्रयत्नानें बाहेर पडून, ज्याप्रमाणें मार्गस्थ मार्गांतील वृक्षाच्या छायेचा थोडा वेळ आश्रय करितो, त्याप्रमाणें कांहीं काळ देहाचा आश्रय करावा. ‘क्षुत्पर्याप्तं तरुभ्यः पतितफलमयं भैक्ष्यं अन्न प्रार्थयेत्-’ केवळ क्षुधा शांत होण्यापुरत्या, वृक्षावरून पडलेलीं फळें(हेंच उत्तम भिक्षान्न) ह्याच भैक्ष्य अन्नाची त्यानें इच्छा करावी. ‘सुखमय स्वात्मारामं प्रवेषुं सः खलु देहतः अपि प्रव्रजेत्-’ आणि (शवेटीं) अत्यंत आनंदमय असा जो स्वतःचा आत्मा यामध्यें प्रवेश करण्याकरितां देहापासूनही निघून जावें (देहाभिमान) सोडावा. आतां पूर्वीं निर्दिष्ट केलेल्या दोन प्रकारच्या संन्यासाचा अनुवाद करितात. सर्प जसा आपली कात टाकतांना मोठ्या सामर्थ्यानें आपल्या जीर्णत्वचेंतून बाहेर निघतो, त्याप्रमाणेंच जो पुरुष पुत्र, कलत्र इत्यादिकांचे ठिकाणीं अनादिकालापासून प्रेम जडल्यानें त्यांचा त्याग करणें अत्यंत दुर्घट आहे तरी, मोठ्या धैर्यानें त्यांचा व स्वगृहाचा त्याग करून संन्यास करितो; ज्याप्रमाणें मार्गस्थ पुरुष मला अद्यापि पुढें जावयाचें आहे असा विचार करून विश्रांतीकरितां क्षणभर त्या मार्गांतील वृक्षछायेचा आश्रय करितो, त्याप्रमाणें परमपुरुषार्थरूपी पुढील गांवाकडे मला जाणें आहे, इकडे लक्ष्य ठेवून त्याच्या उपायाचें अनुष्ठान करण्याकरितां थोडावेळ म्हणजे प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत जो या शरीराचा आश्रय करितो; तसेंच परम पुरुषार्थाच्या उपायाचें अव्याहत अनुष्ठान व्हावें म्हणून शरीररक्षण अत्यंत आवश्यक असल्यामुळें क्षुधाशांति होईल इतक्याच, वृक्षांवरून पडलेल्या फलरूपी भिक्षान्नाची उपेक्षा करितो, म्हणजे फलसंग्रहाची इच्छा न ठेवितां वार्याच्या योगानें जीं फळें वृक्षावरून भूमीवर पडलेलीं असतील त्यांच्याच योगानें क्षुधा-शांति करून घेतो व स्वतः आपल्या हातानें जो फलच्छेद करीत नाहीं; त्यानें आनंदमय अशा आपल्या स्वतःच्या आत्मारामामध्यें प्रवेश करण्याकरितां म्हणजे स्वस्वरूपाला मिळण्याकरितां गृहाप्रमाणें देहालाही सोडून निघून जावें. देहाच्या ठिकाणच्या अभिमान सर्वथैव सोडणें हाच देहसंन्यास होय]१७.