शतश्लोकी - श्लोक २२
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
स्वाज्ञानज्ञानहेतु जगदुदयलयौ सर्वसाधारणौ स्तो
जीवेष्वास्वर्णगर्भं श्रुतय इति जगुर्हूयते स्वप्रबोधे ।
विश्वं ब्रह्मण्यबोधे जगति पुनरिदं हूयते ब्रह्म तद्वच्छुक्तौ
रौप्यं च रौप्येऽधिकरणमथवा हूयतेऽन्योन्यमोहात् ॥२२॥
अन्वयार्थ-‘आस्वर्णगर्भं जीवेषु स्वाज्ञानज्ञानहेतू जगदुदयलयो सर्वसाधारणौ स्तः इति श्रुतयः जगुः-’ हिरण्यगर्भापर्येंत सर्वहि जीवांचे ठिकाणीं, आत्म्याचें अज्ञान, व ज्ञान यांच्या योगानें होणारे जगाचे उदय आणि प्रलय सर्वसाधारण आहेत, असें श्रुति प्रतिपादन करितात. ‘यद्धत् च शुक्तौ रौप्यं अथवा रौप्ये अधिकरणं अन्योन्यमोहात् हूयते तद्वत् स्वप्रबोधे विश्वं ब्रह्मणि हूयते.’ ज्याप्रमाणें एकमेकांविषयीं मोह पडल्यानें शुक्तीच्या ठिकाणीं रौप्य अथवा रौप्याच्या ठिकाणीं अधिकरणभूत शुक्ति यांचा लय होतो त्याप्रमाणें आत्मज्ञान झालें असतां विश्व ब्रह्माचे ठिकाणीं लीन होते‘
अबोधे पुनः इदं ब्रह्म जगति हूयते-’ पण स्वतःचें ज्ञान जेव्हां नसतें त्यावेळी हें ब्रह्म जगामध्यें लोपून जातें.जिगाची व्यक्तावस्था व अव्यक्तावस्था म्हणजेच उत्पत्ति व प्रलय होत; व ते आत्म्याचें अज्ञान व ज्ञान यांच्या द्वारा होत असतात, असें या श्लोकांत आचार्यांनी व्यक्त केलें आहे. आब्रह्मस्तंबपर्यंत सर्वही जीवांना आत्म्याचें ज्ञान व आत्म्याचें अज्ञान ह्या दोन कारणांनी अवश्य होणारे जगाचे उदय व अस्त सर्वसाधारण आहेत; असें श्रुति प्रतिपादन करितात, आत्मज्ञानाच्या योगानें जगाचा लय आत्म्याचे अज्ञानानें त्याचा उदय होत असतो. हिरण्यगर्भसुद्धां स्वतःचें स्वरूप विसरून जाऊन मी ईश्वर आहे; मी ह्या अखिल सृष्टीचा नियंता आहें; असा अभिमान धरितो; व त्या वेळीं हें सर्व जगत् उत्पन्न झालें आहें असें तो पाहतो. तसेंच ज्या वेळीं मी नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव ब्रह्म आहें अशा ज्ञानानें स्वतःच्या स्वरूपामध्यें तो लीन होतो त्यावेळीं ह्या सर्व विश्वाच्या आभासाचाही लय होतो. म्हणजे ज्या वेळीं जीव बहिर्दृष्टि होतो त्या वेळीं त्याला जगाचा अनुभव येत असल्यामुळें त्याचा उदय होतो; व ज्यावेळीं जीव अंतर्दृष्टि होतो त्यावेळीं त्याला जगाचा अनुभव येत नसल्यामुळें त्याला लय होतो; असें म्हणतात. असे हे जगाचे उदय व प्रलय सर्व जीवांचे ठिकाणीं समानच आहेत. ज्याप्रमाणें शिंपी व रुपे ह्यांपैकीं एकाचेंही यथार्थ ज्ञान न झाल्यामुळें शिंपीच्या ठिकाणीं रुप्याचा भास होतो; व त्यावेळीं रुप्यामध्यें शिंपीचा लय होतो; पण भ्रमनिवृत्ति झाली असतां भ्रमाला कारण होणार्या शिंपीचें ज्ञान झाल्यानें पूर्वी भासलेल्या रुप्याचा त्या शिंपीत लय होतो. म्हणजे शुक्तीच्या अज्ञानानें रजताचा उदय व तिच्याच ज्ञानानें रजताचा नाश होतो; त्याचप्रमाणें आत्म्याचें ज्ञान झालें असतां ब्रह्माच्या ठिकाणीं विश्वाचा लय होतो; व आत्म्याच्या विस्मृतीनें तेंच अधिष्ठानभूत ब्रह्म जगामध्यें लोपून जातें ]२२.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP