स्मृत्या लोकेषु वर्णाश्रमविहितमदो नित्यकाम्यादि कर्म
सर्वं ब्रह्मार्पणं स्यादिति निगमगिरः संगिरन्तेऽतिरम्यम् ।
यन्नासानेत्रजिह्णाकरचरणशिरः श्रोत्रसंतर्पणेन तुष्येदंगीव
साक्षात्तरुरिव सकलो मूलसंतर्पणेन ॥८५॥
अन्वयार्थ-‘लोकेषु स्मृत्या यत् अदः नित्यकाम्यादि कर्म वर्णाश्रमविहितं तत् सर्ंव ब्रह्मार्पणं स्यात् इति निगमागिरः अतिरम्यं संगिरन्ते-’ ह्या मृत्युलोकांत स्मृतीनें वर्णाश्रमांच्या अनुरोधानें जी नित्यं-काम्यादि कर्मं सांगितली आहेत तीं सर्व ब्रह्मार्पणच होतात, असें वेदवाणी सयुक्तिकपणानें सांगते. ‘यत् मूलसंतर्पणेन सकलः तरुः इव नासानेत्राजिह्णाकरचरणशिरःश्रोत्रसंतर्पणेन साक्षात् अंगी इव तुष्येत्-’ कारण (पाणी घालून) मुळांना तृप्त केलें असतां जसा सर्व वृक्ष तृप्त होतो तसा घ्राण, नेत्र, जिह्णा, हस्त, चरण, मस्तक, कर्ण इत्यादिकांची तृप्ति केल्यानें, जणु काय साक्षात् हा अंगी (आत्माच) तुष्ट होतो. क्षुद्रदेवतांची जरी आराधना केली तरी ती ब्रह्मालाच पोचतें असें या श्लोकांत सांगतात- स्मृतीनें वर्णाश्रमव्यवस्थेला अनुलक्षून जीं नित्य, काम्य इत्यादि कर्मं सांगितलीं आहेत, त्यांतील निषिद्ध सोडून बाकीचीं पांच कर्में ब्रह्मार्पणच होतात, असें श्रुतीनें मोठ्या मार्मिकपणानें वर्णन केलें आहे. कर्मकर्ता फलाच्या इच्छेनें जरी अन्य देवतांना उद्देशून काम्य कर्म करितो, तरी तें अवयवीभूत ब्रह्मालाच पोंचते. पण कर्त्याची भावना मात्र तशी नसते.तर तो हीं कर्में मी अमुक अमुक देवतेच्या प्रीत्यर्थ करीत आहें अशी दृढ वासना ठेवितो. नित्य, काम्य,नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना व प्रतिषिद्ध अशीं सहा प्रकारची कर्में आहेत. ज्यांचें अनुष्ठान न केल्यास दोष लागतो अशीं संध्यावंदनादि हीं नित्य, स्वर्गादि इष्ट फलांची साधनें जी ज्योतिष्टोमादि ती काम्य, पुत्रजन्मादिनिमित्तानें होणारीं जातेष्ट्यादि नैमित्तिक, पापक्षय करणारीं प्रायश्चित्त, देवतांची आराधना हें उपासना व हिंसादिक हीं निषि० कर्मं होत. त्यांतील नित्यादि चार कर्मांचें बुद्धिशुद्धि हें व उपासनेचें चित्तैकाग्र्य हें मुख्य आहे. नित्य, नैमित्तिक व उपासना यांचें पितृलोकप्राप्ति हें अवांतर (दुसरें, गौण) फल आहे. ‘विविदिषन्ति यज्ञेने’ व ‘कर्मणा
पितृलोक ह्या श्रुति व ‘तपसा किल्बिषं हन्ति’ ही स्मृति याला प्रमाण आहे. आतां अन्य देवतांना उद्देशून केलेलीं कर्में ब्रह्माला कशीं अर्पण होतात, ह्याविषयीं एक दृष्टान्त देऊन असें होणें सयुक्तिक आहे, हें सुचवितात. वृक्षाच्या मुळांत पाणी घातलें असतां त्यांच्या तृप्तीनें जसा वृक्ष तृप्त होतो त्याप्रमाणें अन्य देवतांना उद्देशून जरी कर्म केलें तरी त्यानें अवयवांभूत (सर्व देवतारूप) परमेश्वरच तृप्त होतो. म्ह० नासिका, नेत्र, इत्यादि अवयव तृप्त झाले असतां त्या सर्वांचा समूह जो अवयवी देहि तोच तृप्त होतो. ८५