इन्द्रेन्द्राण्योः प्रकामं सुरतसुखजुषोः स्याद्रतान्तः
सुषुप्तिस्तस्यामानन्दसान्द्रं पदमतिगहनं यत्सं आनंदकोशः।
तस्मिन्नो वेद किंचिन्निरतिशयसुखाभ्यन्तरे लीयमानो
दुःखी स्याद्बोधितः सन्निति कुशलमतिर्बोधयेन्नैव सुप्तम ॥६५॥
अन्वयार्थ-‘प्रकामं सुरतसुखजुषोः रतान्तः सुषुप्तिः स्यात्-’ यथेच्छ संगमसुखाचा अभिलाष करणार्या इंद्र-इंद्राणींची जी रतिसमाप्ति तीच सुषुप्ति होय. ‘यत् अतिगहनं आनंदस्यान्द्रं पदं स आनंदसान्द्रं पदं सं आनंदकोशः-’ त्या अवस्थंतील अति गहन व आनंदघन असें जें स्थान तोच आनंदकोश होय. ‘तस्मिन् निरतिशयसुखाभ्यन्तरे लीयमानः किंचित् न वेद-’ त्या निद्रावस्थेंतील अत्यनत सुखामध्यें लीन झालेला प्राणी कांहींच जाणत नाहीं; व ‘बोधित सन् दुःखी स्यात् इति कुशलमतिः सुप्तं नैव बोधयेत-’ त्याला झोंपेंतून जागें केलें असतां दुःख होतें. म्हणून शहाण्या पुरुषानें निद्रिताला उठवूं नये. िआतां यापुढें आनंदमय कोशाचें व्याख्यान करितात- आनंदस्वरूप ब्रह्माचा निद्रावस्थेंत स्पष्ट अनुभव येत असतो, म्हणून प्रथमतः त्या अवस्थेचेंच स्वरूप ह्या श्लोकांत सांगतात-दक्षिण नेत्रांतील दृक्शक्तिमान पुरुषाला इंद्र व डाव्या नेत्रांतील विषयप्रकाशक ज्योतीला इंद्राणी असें म्हणतात. त्या दोघांच्या संगमाची जी समाप्ति तीच निद्रावस्था होय.
लौकिक सुरताच्या अंतीं म्हणजे रेतस्खलनाच्या वेळीं जसें सुख होतें तसेंच इंद्र व इंद्राणी यांच्या संभोगसमाप्तिकालीं (म्ह० निद्रावस्थेंत) सुख होतें. जाग्रतीमध्यें ती दोघें भुवयांच्या मध्यभागी राहतात; निद्रा आली असतां तीं दोघें तेथून निघून हृदयाकाशांतील पुरीततिनांवाच्या सूक्ष्म नाडींत जाऊन एकत्र राहतात. तेथें जो त्यांचा सुरतप्रसंग (संगम) होतो तीच स्वप्नस्थिति व संगमाची
समाप्ति हीच निद्रावस्था होय. त्या गाढ निद्रेंतील जें आनंदानें भरलेलें स्थान तोच शेवटचा (पांचवा) आनंदमय कोश होय. त्या सुषुप्तिरूप आनंदकोशामध्यें जीव मग्न झाला कीं त्याला कांहीं समजत नाहीं. कारण तो त्यावेळीं निरतिशय सुखामध्यें निमग्न होऊन गेलेला असतो. आतां ‘दुःखी स्यात्े’ इत्यादि चतुर्थ चरणांत त्या सुखाचा सर्वातिशयपणा व्यक्त करितात. निद्रित पुरुषाला जर झोंपेतून बलात्कारानें उठविलें तर त्याला मोठें दुःख होतें. फार काय पण त्याच्याच हिताकरितां (म्ह० भोजनादि विषयसुख घेण्याकरितां) जरी त्याला एकदम जागें केलें तरी तो उठविणार्यावर अतिशय रागावतो. तस्मात् सर्व विषयजन्य सुखांहून आत्मसुखच श्रेष्ठ आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. सारांश आत्मसुख सर्वांत अधिक असल्यामुळें, निद्रावस्थेंत सुख भोगीत असलेल्या पुरुषाला सूज्ञ मनुष्यानें जागे करूं नये. कारण श्रुतीमध्येंहि निद्राभंग करण्यांत मोठा दोष सांगितला आहे. ह्या श्लोकांतील प्रतिपादनाला अनेक शतपथ श्रुति प्रमाण आहेत. स्वप्न व सुषुप्ति यांविषयीं ‘अथ हैतत्पुरुषः कामं परिवर्तते’ ‘अथयदा न कस्य च ने एवमेवैष तच्छेते’ इत्यादि अनेक श्रुति श्लोकप्रतिपादित अर्थाचेंच स्पष्टीकरण करीत आहेत.] ६५.