जीवात्मब्रह्मभेदं दलयति सहसा यत् प्रकाशैकरूपं
विज्ञानं तच्च बुद्धौ समुदितमतुलं यस्य पुंसः पवित्रम् ।
माया तेनैव तस्य क्षयमुगमिता संसृतेः कारणं या नष्टा सा
कार्यकर्त्री पुनरपि भविता नैव विज्ञानमात्रात् ॥९७॥
अन्वयार्थ- ‘यत् प्रकाशैकरूपं विज्ञानं सहसा जीवात्मब्रह्मभेदं दलयति-’ प्रकाश हेंच ज्याचें मुख्य रूप आहे असें ज्ञान तत्क्षणींच जीव, आत्मा व ब्रह्म यांतील भेद घालवितें; ‘तत् च पवित्रं अतुल यस्य पुंसः बुद्धौ समुदितं (अभूत्)-’ व तें पवित्र व निरुपम ज्ञान ज्या पुरुषाच्या बुद्धींत उत्पन्न होतें ‘तस्य या संसृतेः कारणं माया-’ त्याची संसाराला कारण होणारी जी माया, ‘सा तेन एव क्षयं उपगमिता-’ ती त्या ज्ञानानेंच क्षय पावते.(तरी तीचें भान असतें.) ‘विज्ञानमात्रात् सा नष्टा पुनरपि कार्यकर्त्री न एव भविता-’पण केवल ज्ञानानेंच नष्ट झालेली ती माया पुनः भ्रम हें कार्य करणारी होत नाहीं, जीवभ्रम उत्पन्न करीत नाहीं. ज्ञानी पुरुष जरी क्रिया करीत असल्यासारखा वाटतो, तरी त्याची ती क्रिया अज्ञानी पुरुषाच्या क्रियेप्रमाणें सुखःदुखादि संसार उत्पन्न करीत नाहीं; असें आचार्य येथें सकारण प्रतिपादन करितात-आत्मज्ञान वेदांतील महावाक्यांपासून उत्पन्न होत असतें. पण त्यांच्या अर्थाचा बोध गुरुमुखानें करून घेतला पाहिजे व गुरुपदेशानंतर स्वतः युक्तिप्रयुक्तीनें तोच वाक्यार्थ सत्य आहे, अशाविषयीं आपला दृढ निश्चय केला पाहिजे ह्या निश्चित ज्ञानाला ‘चरमवृत्ति म्ह० शेवटची बुद्धिवृत्ति असें म्हणतात. कारण ‘मी ब्रह्म आहे ’ अशी एकदा वृत्ति झाली कीं तो पुरुष अंतःकरणवृत्तिशून्य होत असतो. ज्याचें प्रकाश (अनुभव, साक्षात्कार) हेंच मुख्य रूप आहे, असें हें ज्ञान उत्पन्न होतांच तें जीव, त्वंपदलक्ष्य कूटस्थ आत्मा व तत्पदलक्ष्य ब्रह्म यांतील भेद तत्क्षणींच नष्ट करितें. तें राग, द्वेष इत्यादि दोषांच्या वासनांसह मनाचा सर्व मल घालिवतें. म्हणून पवित्र व निरुपम आहे, असें श्रेष्ठ ज्ञा ज्या दृढ प्रयत्न करणार्या उत्तम अधिकार्याच्या शुद्ध अंतःकरणांत उत्पन्न होतें, त्याच्या त्या ज्ञानानें संसारोत्पत्तीला कारण होणारी माया नष्ट होते. कारण मायेचा नाश करण्यास अन्य कोणत्याच साधनाची अपेक्षा नसते.कार्यकारणभावरहित असल्यामुळें ती निस्तत्त्वरूप माया, प्रकृति या नांवानें शास्त्रांत प्रसिद्ध आहे. मूळ अज्ञान नष्ट झालें तरी तो ज्ञानी व्यवहार करीत असल्यासारखा भासतो, पण त्या केवळ भासानेंच एकदा नष्ट झालेली माया पुनः कधींच भ्रमरूप कार्य करूं शकत नाहीं, ही गोष्ट अगदीं निश्चित आहे] ९७