तत्सत्यं यत्त्रिकालेष्वनुपहतमदः प्राणदिग्व्योममुख्यं
यस्मिन्विश्रान्तमास्ते तदिह निगदितं ब्रह्म सत्यस्य सत्यम्
नास्त्यन्यत्किंच यद्वत्परमधिकमतो नाम सत्यस्य सत्यं
सच्च त्यच्चेति मूर्ताद्युपहितमवरं सत्यमस्यापि सत्यम् ॥५६॥
अन्वयार्थ- ‘यत् त्रिकालेषु अनुपहतं अदः प्राणदिग्व्योममुख्यं तत् सत्यं-’ जें त्रिकालींहि नष्ट न होणारें हें प्राण, दिशा, व्योम इत्यादि अमूर्त जगत् तें सत्य होय. ‘(इदं) यस्मिन् विश्रान्तं आस्ते तत् ब्रह्म इह सत्यस्य सत्यं निगदितम्-’ हें सत्य ज्याचा आश्रय करून रहातें, त्या ब्रह्माला शास्त्रांत सत्याचेंहि सत्य असें म्हटलें आहे. ‘किंच यद्वत् अतःपरं अधिकं (वा) अन्यत् सत्यस्य सत्यं नाम नास्ति-’ शिवाय ज्याच्यासारखें किंवा ज्याच्याहून अधिक व श्रेष्ठ असें ‘सत्याचें सत्य’ या नांवाचें दुसरें कांहीं नाहीं. ‘सच्च त्यच्च इति मूर्ताद्युपहितं अवरं सत्यं (ब्रह्म तु) अस्य अपि सत्यम्-’ सत् व त्यत् या नांवाच्या व्यक्त व अव्यक्त भूतांनीं ज्याचा आश्रय केला आहे तें शबल ब्रह्म सत्य व शुद्ध ब्रह्म तर त्याचेंहि सत्य होय. ब्रिह्मच ‘सत्य’ या शब्दाला पात्र आहे, असें येथें सांगतात-भूत, भविष्यत् व वर्तमान या तिन्हीं कालीं ज्याचा बाध होत नाहीं, अशा ह्या प्राणादि अव्यक्त जगाला सत्य असें व्यवहारांत म्हणतात. पण हें प्राणादि जगत् ज्याच्या आधारानें राहतें, त्या ब्रह्माला आत्मानुभवी पण्डित सत्याचें सत्य म्हणतात. ह्या ब्रह्मासारखें किंवा याहून अधिक असें सत्याचें सत्य दुसरें कांहीहि नाहींं. कारण तसें जर कांही असतें तर त्याचा सर्वप्रकाशक वेदांत अवश्य कोठें तरी उल्लेख असता. पण तसा उल्लेख कोठेंहि नाहीं. अर्थात् ब्रह्मच सत्य आहे. या श्लोकाच्या चतुर्थचरणांत सत्यशब्दाची व्युत्पत्ति सांगतात. सत् म्हणजे पृथ्वी, आप् व तेज हीं साकार व असत् म्ह० वायु व आकाश हीं निराकार भूतें, ज्याच्या आश्रयानें राहतात, त्या शबल ब्रह्माला सत्य असें म्हणतात; पण शुद्ध ब्रह्म या सत्याचेंहि सत्य आहे.] ५६.