क्षीरान्तर्यद्वदाज्यं मधुरिमविदितं तत्पृथग्भूतमस्माद्भूतेषु
ब्रह्म तद्वद्व्यवहृतिविदितं श्रांतविश्रांतिबीजम् ।
यं लब्ध्वा लाभमन्यत्तृणामिव मनुते यत्र नोदेति भीतिः
सान्द्रानन्दं यदन्तःस्फुरति तदमृतं विद्ध्य़तो ह्यन्यदार्तम् ॥४८॥
अन्वयार्थ-‘यद्धत् क्षीरांतर् आज्यं मधुरिमविदितं तत् अस्मात् पृथग्भूतं-’ ज्याप्रमाणें दुधांत असणारें घृत त्याच्या माधुर्यावरून समजतें, व तें दुध्धाहून पृथक् असतें; ‘तद्वत् भूतेषु ब्रह्म व्यवहृतिविदितं श्रांतविश्रांतिबीजं (अस्ति)-’ त्याप्रमाणें सर्वभूतांमध्यें ब्रह्म आहे, व तें सर्वभूतांच्या व्यवहारावरून समजतें.(अर्थात् तें पृथकृ आहे.) तें श्रांतपुरुषाच्या निद्रावस्थेंतील विश्रांतीचें कारण आहे. ‘यं लब्ध्वा लाभं अन्यत् तृणं इव मनुते-’ ज्याची प्राप्ति झाली असतां पुरुष इतर लाभ तृणासारखे मानितो; ‘यत्र भीतिः न उदेति-’ तसेंच ज्या ठिकाणीं कोणतेहि प्रकारची भीति उत्पन्न होत नाहीं; ‘यत् सान्द्रानंदं अन्तः स्फुरति-’ जें अत्यंत आनंदरूप तत्त्व आंतल्या आंत स्फुरतें ‘तत् अमृतं विद्धि-’ तें अमृत आहे, तूं असें जाण- ‘अतः अन्यत् आर्त हि-’ त्याहून इतर सर्व पदार्थ नाशवंत आहेत. िआतां ह्या श्लोकामध्यें विश्वांतील सर्व प्राण्यांच्या व्यवहार आत्मसंबंधानेंच होत असतो; असें सांगतात-दुधामध्यें घृत असतें व तें दुधाच्या मिष्टपणावरून समजतें. तें घृत दूध या पदार्थाहून भिन्न आहे, असें मंथनानंतर प्रत्यक्ष अनुभवाला येतें. पण ज्याप्रमाणें तेंच दुधापासून काढिलेलें घृत पुनः दुधामध्ये टाकिलें असतां त्यांत मिळून जात नाहीं, त्याचप्रमाणें सर्व सृष्ट पदार्थांमध्ये ब्रह्म आहे; त्याचें सर्व प्राण्यांच्या व्यवहारावरून ज्ञान होतें, आणि म्हणूनच तं सर्वहि भूतांहून भिन्न आहे. ज्ञानी पुरुषाला तें पृथक् आहे असा अनुभव आला म्हणजे तो जरी ह्या जगांतील सृष्ट पदार्थांकडे पहात असला, तरी त्यांच्याहून पृथक् असलेल्या ब्रह्माला कधींहि विसरत नाहीं. हें ब्रह्म, जागृतींत अनेक व्यवहार करून श्रमलेल्या पुरुषाच्या सुषुप्तीमध्यें प्राप्त होणार्या विश्रांतीला कारण होतें. ज्याची प्राप्ति झाली असतां ज्ञानी पुरुष सर्व जगाला तृणासारखें तुच्छ लेखितो; ज्या ब्रह्माच्या ठिकाणीं द्वैतभाव नसल्यामुळें व्यवहाराप्रमाणें तेथें कोणतीहि भीति नसते, ज्याच्या योगानें निद्रावस्थेमध्यें स्थूलसूक्ष्मप्रपंचाचा लय होऊन मन आत्मरूप होतें, व ज्यामुळें अत्यंत आनंदरूप वस्तूचा अंतःकरणांत प्रकाश पडतो तें अमृत (ब्रह्म) आहे असें समज. त्याच्याहून दुसरे सर्वहि पदार्थ क्षुद्र आहेत. कारण शुक्तिकेच्या ठिकाणी भासणार्या रजताप्रमाणें त्यांच्या अधिष्ठानाचें ज्ञान झालें असतां त्यांचा बाध होतो, सारांश केवल उदकमय दुग्धामध्यें जें उदकाहून अगदीं निराळें असें माधुर्य अनुभवाला येतें, तें घृताचेंच होय, उदकाचें नव्हे हें प्रसिद्ध आहे. तसेंच या जड देहामध्यें जे चलनादिक व्यापार व इंद्रियांमध्यें जी विषयग्रहणशक्ति आहे, ती आत्म्याचीच आहे, शरीराची नव्हे, कारण मृत शरीर निश्चेष्ट असतें हें प्रसिद्ध आहे]४८.