आत्माम्भोधेस्तरंगोऽस्म्यहमिति गमने भावयन्नासनस्थः ।
संवित्सूत्रानुविद्वो मणिरहमिति वा चेन्द्रियार्थप्रतीतौ ॥
हृष्टोऽस्म्यात्मावलोकादिति शयनविधौ मग्न आनन्दसिन्धावन्तर्निष्ठो मुमुक्षुः
स खलु तनुभृतां यो नयत्येवमायुः ॥१२॥
अन्वयार्थ- ‘गमने अहं आत्मांभोधेः तरंगः (इति भावयन्)-’ गमनप्रसंगीं मी आत्मसमुद्राचा एक तरंग आहें अशी भावना करून, ‘आसनस्थः संवित्सूत्रानुविद्ध मणिः अहं अस्मि (इति भावयन्)-’
आसनावर बसला असतां ज्ञानरूप सूत्रामध्यें ओंवलेला मी एक मणी आहें. अशी भावना करून ‘इंद्रियार्थप्रतीतौ आत्मावलोकात् हृष्टोस्मि (इति भावयन्)-’ विषयानुभव घेत असतां आत्मदर्शनझाल्यानें मी अत्यंत आनंदित झालों आहें अशी भावना करून, व ‘शयनविधौ आनंदसिंधौ मग्नः च (इति भावयन्)’ निद्रावस्थेमध्यें मी आनंदसमुद्रामध्यें निमग्न झालों आहें अशी भावना करून ‘यः मुमुक्षुः एवं आयुः नयति स खलु तनुभृतां अंतर्निष्ठः-’ जो मुमुक्षु ह्या प्रमाणें आपलें आयुष्य घालवितो, तो खरोखर प्राण्यांमध्यें अंतर्निष्ठ होय.हि सर्वही ब्रह्म आहे अशा भावनेनें सिद्ध झालेल्या अंतर्निष्ठ पुरुषाचें स्वरूप बारा आणि तेरा अशा दोन श्लोकांमध्यें संागितलें आहे. प्रसंगविशेषीं इकडे तिकडे गमन करीत असतां, ज्याप्रमाणें पाण्याची लाट बाह्याभ्यंतर जलमयच असून इकडे तिकडे फिरते त्याप्रमाणें, मी जीवसुद्धां ह्या पारावारशून्य आत्मसमुद्रामध्यें बाह्याभ्यंतर तन्मयच असल्यामुळें लाटेसारखा आहें, अशी भावना करीत गमन करितो. ‘‘क्रीडन्नूर्मिरपामिव’’ म्हणजे उदकाच्या लाटेप्रमाणें क्रीडा करणारा अशी श्रुतिही आहे. त्याचप्रमाणें आसनावर स्वस्थ बसला असतां आत्मस्वरूपभूत-ज्ञानरूप सूत्रामध्यें ओंवलेला मी जीवरूपी (माळेंतील मण्याप्रमाणें) एक मणी आहें, अशी भावना करीत असतो. ‘‘मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ’’ सूत्रामध्यें जसे माळेचे मणी ओंवलेले असतात त्याप्रमाणें हें सर्व दृश्यजात माझे ठिकाणीं ओंवलेलें आहे, असें भगवंताचेंही म्हणणें आहे. ह्याप्रमाणें देह व्यापार करीत असतांही मुमुक्षु अंतर्निष्ठ कसा असतो हें दाखवून आतां त्याचा इंद्रियव्यापार चालला असतांही तो अंतर्निष्ठच असतो हें दाखवितात. ज्याअर्थी कोणताही अनुभव आत्म्याच्या ज्ञानकलेवांचून येणें शक्यच नाहीं त्याअर्थीं त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा अनुभव घेत असतां ‘मला ह्यावेळी आत्म्याचेंच दर्शन झाल्यामुळें मी अत्यंत संतुष्ट झालों आहे’ अशी भावना करितो; व निद्रावस्था संपल्यानंतर मी आनंदसमुद्रामध्यें एवढा वेळपर्यंत निमग्न होतों अशी भावना करितो. सारांश ह्याप्रमाणें जो मुमुक्षु आपलें आयुष्य घालवितो त्यालाच अंतर्निष्ठ असें ह्मणतात. ह्या श्लोकांत स्थूल देहाच्या व्यवहारानें जाग्रदवस्था; विषयानुभवानें स्वप्न किंवा सूक्ष्मावस्था आणि निद्रावस्थेनें कारणावस्था दाखवून ह्या तिन्ही अवस्थांमध्यें अंतर्निष्ठ पुरुष आत्मानुसंधान कसें ठेवितो हें सुचविलें आहे] १२.