शतश्लोकी - श्लोक २१
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
लोके भोजः स एवार्पयति गृहगतायार्थिनेऽन्नं कृशाय यस्तस्मै
पूर्णमन्नं भवति मखविधौ जायतेऽजातशत्रुः ।
सख्ये नाऽन्नार्थिने योऽर्पयति न स सखा सेवमानाय नित्यं
संसक्तायान्नमस्यमाद्विमुख इव परावृत्तिमिच्छेत्कदर्यात् ॥२१॥
अन्वयार्थ-‘यः कृशाय गृहगताय अर्थिने अन्नं अर्पयति सः लोकं भोजः एव-’ जो पुरुष कृश होऊन अन्नाकरितां आपल्या घरी आलेल्या याचकाला अन्न देतो तो भोज (होय). ‘तस्मै मखविधौ पूर्ण अन्नं भवति अजातशत्रुः (च) जायते-’ त्याला यज्ञामध्यें अन्नाची कधीं उणीव पडत नाहीं, व तो अजातशत्रु होतो. (म्हणजे त्याला कोणी शुत्रुही उत्पन्न होत नाहीं.) ‘नित्य संसक्ताय सेवमानाय सख्ये अन्नार्थिने यः अन्नं न अर्पयति सः न सखा-’ तसेंच जो सर्वदा आपल्या आश्रयानें रहाणार्या, सेवा करणार्या, अन्नाची याचना करणार्या मित्राला अन्न देत नाहीं तो त्याचा सखा नव्हे.‘अस्मात् कदर्यात् विमुखः इव परावृत्तिं इच्छेत्-’ अशा कृपणापासून याचक विमुख झाल्याप्रमाणें दुसर्या दात्याकडे जाण्याची इच्छा करतो. आपल्याकडे कोणीही याचक आला असतां त्याची इच्छा पूर्ण करणारा भोज होय, असें ‘‘स इद्भोजो यो गृहवे ददात्यन्नं’’ इत्यादि श्रुतीच्या आधारानें सांगतात. दारिद्यानें अत्यंत कृश होऊन याचना करण्याकरितां आपल्या घरीं आलेल्या पुरुषाला जो शरीरस्वास्थ्याकरितां अत्यंत अवश्य असलेलें अन्न देतो, तो ह्या जगामध्यें खरा भोज (अन्नदाता) होय. त्याला यज्ञादिक कृत्यांमध्यें कधींही अन्नाची तूट पडत नाहीं. वस्तुतः यज्ञादिक कृत्यांमध्यें अन्नाचा पुरवठा होणें अत्यंत अशक्य असतें. कारण त्यावेळीं कितीही जरी याचक आले तरी कोणालाही विमुख होऊं न देतां मिष्टान्नसंतर्पणानें यजमानानें त्यांना तृप्त करावें असें विधान आहे. पण अशा प्रसंगींही दात्या पुरुषाला अन्नाची उणीव पडत नाहीं. तसेंच हा दाता सर्वही प्राण्यांना यथेच्छ अन्नदान करून त्यांच्या ठिकाणच्या देवतांना तृप्त करीत असल्यामुळें त्याला कधींच कोणी शत्रु उत्पन्न होत नाहीं. ह्या व्यवहारांत सुद्धां जो कधीं कोणाचा द्वेष किंवा हेवा करीत नाहीं त्याला पुष्कळ मित्र असतात असा अनुभव आहे. आतां याच्या उलट प्रकार होतो तें दाखवितात. जो पुरुष अन्नाची इच्छा करून सतत सेवा करण्याकरितां आपला आश्रय करून राहिलेल्या आपल्या मित्राला अन्न देत नाहीं तो जगांत कोणाचाही मित्र होत नाहीं. तर तो पिशुन होतो. सारांश आपली सेवा करून केवळ आपल्यावरच अवलंबून राहिलेल्या दरिद्री मनुष्याला जो अन्न देत नाहीं, तो इतरांना काय देणार ? या श्लोकामध्यें अर्थी पुरुषाला उद्देशून ‘सख्ये’ असें पद घातलें आहे. त्याचा हेतु असा कीं अर्थी पुरुष दात्याला स्वर्ग देत असतो (म्हणजे उत्तम पदप्राप्ति करून देतो) म्हणून तो मित्र होय. पण ह्या कृपण पुरुषापासून इच्छा पूर्ण न झाल्यामुळें याचक विमुख होऊन आपलें दुष्कृत त्याला देऊन व त्याचें सृकृत घेऊन दुसर्या दात्याकडे याचनेस्तव जातो. ‘‘अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते । स तस्मै दुष्कृतं दत्वा पुण्यमादाय गच्छति’’ असें मनुवचनही आहे]२१.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP