भीत्या रोदित्यनेन प्रवदति हसति श्र्लाघते नूतमस्मात्वस्वप्नेप्यंगेनुबंध
त्यजति न सहसा मूर्च्छितेऽप्यंतरात्मा ।
पूर्वं ये येऽनुभूतास्तनुयुवतिहयव्याघ्रदेशादयोऽर्थास्त-
त्संस्कारस्वरूपान्सृजति पुनरमून् श्रित्य संस्कारदेहम ॥७७॥
अन्वयार्थ-‘भीत्या अनेन रोदिति (तथा अनेन) प्रवदति हसति श्राघते-’ स्वप्नांत भीति वाटल्यानें या देहानें रडतो, ह्यानेंच बडबडतो, ह्यानेंच हंसतो व ह्यानेंच स्वतःची स्तुति करितो. ‘नूनं अस्मात् अंतरात्मा स्वप्ने अपि अंगे मूर्च्छिते अपि सहसा अनुबंधं न त्यजति-’ तेव्हां खरोखर यावरून अंतरात्मा स्वप्नांत सुद्धां देह निश्चेष्ट पडला असला तरीहि त्याचा संबंध एकाएकीं सोडीत नाहीं असें झालें. ‘पूर्वं तनुयुवतिहयव्याघ्रदेशादयः ये ये अर्थाः अनुभूताः तत्संस्कारस्वरूपान् अमून् पुनः संस्कारदेहं श्रित्य सृजति-’ पूर्वीं अनादि जाग्रतींत देह, स्त्री, अश्व, व्याघ्र, प्रदेश इत्यादि जे जे विषय अनुभविले होते त्यांच्या संस्काररूप असे हे सर्व विषय तो पुनः लिंगदेहाचा आश्रय करून उत्पन्न करितो. स्विप्नांत अन्य देह उत्पन्न होतो असें मानल्यास आणखी कोणता दोष येतो तें सांगून पुनःस्वमत स्पष्ट करितात स्वप्नांत चोराची किंवा व्याघा्रची भीति वाटून प्राणी स्थूलदेहानेंच मोठमोठ्यानें आक्रोश करितो. यानेंच कांहीतरी बडबडतो, हंसतो व मी कृतकृत्य झालों अशी स्वतःचीच वाहवा करितो, हें सर्वप्रसिद्ध आहे. ह्याप्रमाणें पूर्वपक्षाचा अनुवाद करून आतां पूर्वीं सांगितलेलीच गोष्ट सिद्ध झालीं असें सांगतात. ह्यावरून स्वप्नांत स्थूल देह निश्चेष्ट असला तरी अंतरात्मा त्याचा संबंध सहसा टाकीत नाहीं, असेंच निश्चित झालें. ‘अहो, पूर्वीं त्यांचा कांहीं संबंध नाहीं असें सांगून आतां येथें त्याच्या विरूद्ध कसें सांगतां’ असा प्रश्र्न कोणी विचारतील म्हणून सांगतात. अनादिकालापासून प्रवृत्त झालेल्या ह्या जन्ममरणरूप संसारांत हा प्राणी अनेक देहांनीं अनेक जाग्रतींत असंख्य भोग भोगतो. ते जे पूर्वानुभूत उच्चनीच देह, स्वकीय किंवा परकीय स्त्री, गमनसाधन अश्व, भयकारण व्याघ्र, काशीसारखे प्रदेश इत्यादि विषय त्यांचा मनाला संस्कार झालेला असतो. त्यामुळें संस्कार (स्मृतीचें कारण, बीज) हेंच ज्यांचें स्वरूप आहे असे ते शरीरादि विषय पूर्वीप्रमाणें जसेच्या तसे भासतात. सारांश अंतरात्मा शरीराचा आश्रय करितो व त्यामध्यें सर्व संस्कार जागे होऊन त्या त्या विषयरूपानें व्यक्त होतात]७७