शतश्लोकी - श्लोक ३९
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
मध्यप्राणं सुषुप्तौ स्वजनिमनुविशन्त्यग्निसूर्यादयोऽमी
वागाद्याः प्राणवायुं तदिहनिगदिता ग्लानिरेषां न वायोः ।
तेभ्यो दृश्यावभासो भ्रम इति विदितः शुक्तिकारौप्यकल्पः
प्राणायामव्रतं तच्छ्रतिशिरसि मतं स्वात्मलब्धौ न चान्यत् ॥३९॥
अन्वयार्थ-‘सुषुप्तौ अमी अग्निसूर्यादयः स्वजनिं-मध्यप्राणं अनुविशन्ति-’ सुषुप्तीमध्यें ह्या अग्नि-सूर्यादिक देवता स्वकारणभूत मुख्य प्राणामध्यें प्रविष्ट होतात. ‘(तथा) वागाद्याः प्राणवायुं
(अनुविशन्ति)-’ तसेंच वागादि इंद्रियें प्राणवायूंत प्रविष्ट होतात. ‘तत् एषां इह ग्लानिः निगादिता’ म्हणून त्यांचा सुषुप्त्यवस्थेमध्यें लय होतो असें सांगितलें आहे. ‘(कितु) वायोः न (ग्लानिः)’ (परंतु) प्राणवायूचा कधींच लय होत नाहीं. ‘शुक्तिकारौप्यकल्पः तेभ्यः (यः) दृश्यावभासः (सः) भ्रमः इति विदित.’अर्थात् शिंपीच्या ठिकाणीं जसा रुप्याचा भास होतो, तसा इंद्रियांच्या योगानें जो हा जगाचा भास होत असतो, तो भ्रम आहे; असें समजतें. ‘तत् स्वात्मलब्धौ प्राणायमव्रतं श्रुतिशिरसि मतं न च अन्यत्-’ म्हणून आत्म्प्राप्ति होण्याकरितां प्राणायामव्रतच वेदान्तसंमत आहे. अन्य कांहीं नाहीं.ह्याप्रमाणें मागच्या श्लोकांत स्वप्नाच्या दृष्टांन्तानें जगत् मिथ्या आहे. असें प्रतिपादन करून हया श्लोकांत ‘तें सत्य आहे’ असें भासणार्या जाग्रत-अवस्थेंतही तें मिथ्याच आहे असें निरूपण करितात. ‘वाणीची देवता अग्नि, प्राणाची देवता वायु, नेत्रांची देवता सूर्य, श्रवणांची देवता दिशा व त्वगिंद्रियाची देवता ओषधिवनस्पति’ होय? असें उपनिषदांतून अनेक ठिकाणीं वर्णन आहे. सुषुप्तीमध्यें ह्या सर्व इंद्रियदेवता मुख्य प्राणांत (विराट्संज्ञक जीवतत्त्वांत) प्रविष्ट होतात. कारण तो मुख्य प्राणच त्यांचे उत्पत्तिस्थान आहे. तसेंच वाक्, चक्षु इत्यादि इंद्रियें, इंद्रनांवाच्या प्राणवायूंत प्रविष्ट होतात. ह्मणूनच देवतांसह इंद्रियांचा सुषुप्तींत लय होतो असें उपनिषदांत सांगितलें आहे. पण ह्या स्थूलसूक्ष्मप्रपंचाचा जीत लय होत असतो, अशा सुषुप्तींत प्राणवायूचा कधींच अस्त होत नाहीं. कारण श्वासरूपानें तो त्या अवस्थेंतही प्रत्यक्ष दिसत असतो; व यावरून जागृतींत आपल्याला इंद्रियांच्या द्वारा जी रूप-रसादि विषयांची प्रतीति येत असल्यासारखी वाटते ती खरी नव्हे; तर तो शुक्तिरौप्यप्रतीतीप्रमाणेंच भ्रम आहे; असें समजतें. यास्तव तीन्ही अवस्थांमध्यें लय न पावणार्या प्राणाचें नियमन करणें हाच आत्मज्ञानाचा उत्तम उपाय आहे. असें वेदान्तांत सांगितलें आहे; पण चक्षुरादि इंद्रियव्रताचा कोठेंही उपदेश केलेला नाहीं. कारण तीं इंद्रियें कोणत्याच अवस्थेंत आत्मसाक्षात्कार करून द्यावयास समर्थ होत नाहीं]३९.
Last Updated : November 11, 2016
TOP