शतश्लोकी - श्लोक ४०
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
नोऽकस्मादार्द्रमेधः स्पृशति च दहनः किंतु शुष्कं
निदाघादार्द्रं चेतोऽनुबंधैः कृतसुकृतमपि स्वोक्तकर्मप्रजार्थैः ।
तद्वज्ज्ञानाग्निरेतत्स्पृशति न सहसा किंतु वैराग्यशुष्कं तस्माच्छुद्धो विरागः
प्रथममभिहितस्तेन विज्ञानसिद्धिः ॥४०॥
अन्वयार्थ-‘दहनः आर्द्रं एधः अकस्मात् नो अकस्मात् नो स्पृशति च, किंतु निदाघात् शुष्कं (स्पृशति)-’ अग्नि ओल्या काष्ठाला एकाएकीं स्पर्श करीत नाहीं परंतु उष्णतेनें वाळून शुष्क झालेल्या
काष्ठाला स्पर्श करितो (जाळतो) ‘तद्वत् अनुबन्धैः एतत् आर्द्रं चेतः स्वोक्तकर्मप्रजार्थैः कृतसुकृतं अपि ज्ञानाग्निः सहसा न स्पृशति’ तसेंच भार्यापुत्रादि उपाधींनीं आर्द्र झालेल्या ह्या अंतःकरणाला, विहित कर्म, प्रजा व वित्त यांच्याद्वारा त्या अंतःकरणानें सुकृत केलें तरी, ज्ञानाग्नि सहसा स्पर्श करीत नाहीं. ‘किंतु वैराग्यशुष्कं (स्पृशति)-’ परंतु वैराग्यानें शुष्क झालेल्या अंतःकरणाला तो स्पर्श करितो ‘तस्मात् प्रथमं शुद्धः विरागः अभिहितः-’ ह्मणून प्रथमतः शुद्ध विरक्ति सांगितली आहे. (‘ततः) तेन विज्ञानसिद्धिः (भवति)-’ आणि मग तिच्या योगानें ज्ञानसिद्धि होते. विैराग्याच्या योगानेंच ज्ञानप्राप्ति होते असें ह्या श्लोकांत आचार्यांनी दर्शविले आहे. ओल्या काष्ठाला अग्नि एकदम जाळीत नाहीं. पण वाळलेल्या इंधनाला तत्क्षणींच जाळून टाकतो, हें सर्वप्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणें भार्यादि विषयांच्या योगानें दूषित झालेल्या अंतःकरणांत ज्ञानोदय होत नाहीं. आपल्या वर्णाला व आश्रमाला उचित अशीं संध्यावंदनादि कर्में, धर्मपत्नीपासून पुत्रोत्पत्ति, व द्रव्यसाध्य यज्ञदानादि यांच्या योगानें, एखाद्या पुरुषानें पुष्कळ पुण्य जरी संपादन केलें असलें तरी त्याचें अंतःकरण विषयासक्त असल्यामुळें त्यांतही ज्ञानाचा प्रकाश पडत नाहीं. परंतु विषयवैराग्यानें ज्या धन्य पुरुषाचें अंतःकरण रूक्ष होऊन गेलेलें असतें त्यालाच ज्ञानप्राप्ति होते. म्हणून प्रथमतः साधकानें अवश्य शुद्ध वैराग्यसंपन्न (वांति होऊन पडलेल्या अन्नाप्रमाणें विषयांविषयीं निस्तृष्ण) व्हावें; असें वेदान्तांत अनेक स्थळीं सांगितलें आहे; व असें उत्तम वैराग्य प्राप्त झालें असतां मग अनायासें ज्ञानसिद्धि होते. ह्या विषयीं ‘न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेने’ ह्मे कर्मानें, प्रजेनें, किंवा वित्तानें मोक्षप्राप्ति होत नसून केवळ विरक्तीनेंच त्याची प्राप्ति होते; अशा अर्थाची श्रुति प्रमाण आहे]४०.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP