देहस्त्रीपुत्रमित्रानुचरहयवृषास्तोषहेतुर्ममेत्थं ।
सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलममी मांसमीमांसयेह ॥
एते जीवन्ति येन व्यवहृतिपटवो येन सौभाग्यभाजस्तं
प्राणाधीशमतर्गन्तममृतममुं नैव मीमांसयन्ति ॥५॥
अन्वयार्थ- ‘देहस्त्रीपुत्रामित्रानुचरहयवृषाः मम तोषहेतुः इत्थं सर्वे प्रथितं अलं स्वायुः इह मांसमीमांसया नयन्ति-’ देह, स्त्री, पुत्र, मित्र, सेवक, अश्व, व वृषभ हे सर्वही मला संतोष देणारे आहेत, असें समजून हे सर्व लोक आपलें प्रसिद्ध असें संपूर्ण आयुष्य ह्याव्यवहारामध्यें मांसमीमांसा करीत घालवितात. ‘(किंतु) एते येन जीवन्ति-’ परंतु हे सर्व (स्त्री-पुत्रादिक) ज्याच्या योगानें जिवंत राहतात, ‘(तथा) येन व्यवहृतिपटवः (भवन्ति तथा येन) सौभाग्यभाजः (भवन्ति)-’ ज्याच्यामुळें व्यवहारदक्ष होतात, आणि ज्याच्यामुळें सौंदर्यादि गुणसंपन्न होतात, ‘ तं अमुं प्राणाधीशं अंतर्गतं अमृतं नैव मीमांसयन्ति-’ त्या ह्या सर्वोतर्गत व मरणधर्मरहित अशा प्राणेश्वराची कधींच मीमांसा करीत नाहींत. (श्रीमत् आचार्य लोकांच्या अयोग्य वर्तनाकडे पाहून पुनः आश्चर्यानें म्हणतात-हे अखिल लोक, देहादिक सर्वही मला आनंद देणारे आहेत, अशा अभिमानानें आणि त्याचप्रमाणें देहादि पुष्ट किंवा कृश झाले असतां मीच पुष्ट किंवा कृश झालों आहें असें खोटेंच मानून आपलें कुल, शील, विद्या यांनी प्रसिद्ध असलेलें सर्व आयुष्य ह्या मांसाचा विचार करण्यांत व्यर्थ घालवितात. म्हणजे ते स्वसंबद्ध अशा दुसर्या सर्व वस्तु व प्राणी माझे आहेत, यांच्या स्वास्थानें मला सुख होणार, मला एकट्याला सुख होण्याकरितां जगांतील अनंत प्राण्यांना अनंत क्लेश झाले तरी कांहीं हरकत नाहीं, अशा विवंचनेंत आपलें अमूल्य आयुष्य घालवितात; परंतु हे सर्व देह स्त्री-पुत्रादिक ज्याच्यामुळें जीवंत राहतात, ज्याच्या योगानें मोठे व्यवहारकुशल होतात, आणि ज्याच्या योगानें सौंदर्यवान्, पराक्रमी, शूर, वीर, इत्यादि विशेषणांना पात्र होतात, त्या सर्वोच्याही अंतर्यामीं असणार्या व देहादिक नष्ट झाले तरी नष्ट न होणार्या ह्या स्वानुभवसिद्ध मुख्य आत्म्याचा कधींच विचार करीत नाहींत; हें केवढें आश्चर्य आहे ! ! बुद्धीला मोह पडला असतां तिच्यामध्यें सदसद्विवेकशक्ति रहात नाहीं; आणि त्यामुेंच खर्याला खोटें व खोट्याला खरें असे ती मानिते. सर्व प्राकृत पुरुषांना मोह पडल्यामुळें त्यांना सद्रूप आत्म्याचा विसर पडतो व ते असत्य अनात्म्याच्या ठिकाणींच अभिमान ठेवितात. ह्यांत आश्चर्य एवढेंच कीं, ह्या आत्म्याचा सर्वदा अनुभव येत असूनही त्याच्याविषयीं थोडा तरी विचार करावा असें त्यांना कधीं चुकूनही वाटत नाहीं.] ५