मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६६

शतश्लोकी - श्लोक ६६

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


सर्वे नन्दन्ति जीवा अधिगतयशसा गृह्णता चक्षुरादीन्तःसर्वोपकर्त्रा
बहिरपि च सुषुप्तौ यथा तुल्यसंस्थाः ।
एतेषां किल्बिषस्पृक् जठरभृतिकृते यो बहिर्वृत्तिरास्ते
त्वक्चक्षुःश्रोत्रनासारसनवशमितो याति शोकं च मोहम॥६६॥

अन्वयार्थ-‘अंतः चक्षुरादिन् गृह्णता बहिः अपि च सर्वोपकर्त्रा अधिगतयशसा यथा सुषुप्तौ (तथा) तुल्यंसंस्थाः सर्वे जीवाः नन्दन्ति-’ आंत चक्षुरादिक इंद्रियांना व्यापणार्‍या व बाहेरहि (विषयद्वारा) सर्वांवर उपकार करणार्‍या आणि (सर्वदा सर्वांना) प्राप्त असलेल्या ब्रह्मानें, गाढ निद्रावस्थेप्रमाणें सारख्या स्थितींत असणारें सर्व जीव आनंदित होतात. ‘एतेषां यः जठरभृतिकृते
बहिर्वृत्तिः आस्ते (सः) किल्बिषस्पृक्-’ त्यांतील जो पोट भरण्यास्तव बहिर्वृत्ति (देहेंद्रियाभिमानी) होतो तो दुःख भोगतो.‘( सः) त्वक्चक्षुःश्रोत्रनासारसनवशं इतः सन् शोकं मोहं च याति-’
(म्हणजे) त्वक् चक्षु, श्रोत्र, घ्राण व रसना यांच्या अधीन झाल्यानें त्याला शोक व मोह होतो. पूर्व श्लोकांत आत्मसुख सर्वांत श्रेष्ठ आहे असें सुषुप्तींतील अनुभवानें दाखविले. आतां येथें त्याच अर्थाचें प्रतिपादन करणार्‍या ऋग्वेदस्थ ‘सर्वे नंदन्ति यशसो’ इत्यादि श्रुतीचा अनुवाद करितात.- आत्मा (ब्रह्म) सर्वप्राण्यांच्या हृद्देशीं असल्यामुळें सर्वांना पूर्वींच प्राप्त झालेला आहे. अशा त्या सर्वांच्याहि अगदी जवळ असणार्‍या, देहांत नेत्रादि इंद्रियांना दर्शन, श्रवण इत्यादिशक्ति देऊन (म्ह०  त्यांना स्वाधीन ठेवून) व देहाबाहेर रूपरसादि विषयांचा भोग करवून सर्व प्राण्यांवर उपकार करणार्‍या आत्म्याच्या सत्तेनें सर्वांना आनंद होत असतो. निद्रावस्थेमध्यें सर्व एका अनिर्वाच्य रूपाला जाऊन मिळत असतात; व त्यामुळें त्यांच्यामध्यें जसा कोणत्याहि प्रकारचा भेद रहात नसतो, तसाच ह्या सर्वहि प्राण्यांमध्यें वस्तुतः वर्णाश्रमादि कोणत्याहि प्रकारचा भेद नाही. पण ह्यांच्यापैकीं जो प्राणी उदरभरणार्थ अन्नादि विषय संपादन करूं लागतो तो तत्क्षणींच दुःखी होतो. त्वचेनें स्त्रयादि स्पर्शाच्या, नेत्रानें सौंदर्यादि रूपाच्या,  श्रोत्रानें गायनादि श्रवणाच्या, घ्राणानें सुगंधादिकांच्या व रसनेनें मिष्टान्नादि रसाच्या अधीन झाला कीं पुरुष मोहित होऊन दुःखांत पडतो. सारांश हा संसार अनर्थकर होण्याला हे विषयच कारण आहेत. तस्मात् विचारावानानें निरतिशय सुखरूप आत्म्याकडे अनुसंधान ठेवून केवल विषयचिंतनानेंच प्राप्त होणार्‍या अनर्थाला टाळावें. हाच खरा पुरुषार्थ आहे] ६६.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP