आनन्दान्यश्च सर्वाननुभवति नृपः सर्वसंपत्समृद्धस्तस्यानन्दः
स एकः स खलु शतगुणः संप्रतिष्ठः पित़ृणाम् ।
आदेवब्रह्मलोकं शतशतगुणितास्ते यदन्तर्गताः स्युर्ब्रह्मानन्दः
स एकोऽस्त्यथ विषयसुखान्यस्य मात्रा भवन्ति ॥७१॥
अन्वयार्थ-‘यः सर्वसंपत्समृद्धः सर्वान् आनंदान् अनुभवति-’ जो एखादा सर्व संपत्तीनें समृद्ध असणारा राजा सर्व सुखाचा अनुभव घेतो ‘सः तस्य एकः आनंदः-’ तो त्याचा एक आनंद होय. ‘स खलु शतगुणः संप्रतिष्ठः पितृणां (एकः)-’ तोच शतपट झाला असतां पितरांचा (एक आनंद होतो.) ‘(एवं) आदेवब्रह्मलोकं शतशतगुणिताः ते यदन्तर्गताः स्युः-’ याप्रमाणें देवलोकापासून
ब्रह्मलोकापर्यंत शतपटीनें अधिक असणारे हे सर्वहि आनंद ज्यांत अंतर्भूत होतात. ‘सः एकः ब्रह्मानंदः अस्ति-’ तो एक ब्रह्मानंद होय. ‘अथ विषयसुखानि अस्य मात्राः भवन्ति-’ आणि हीं सर्व विषयसुखें ह्या ब्रह्मानंदाचेच अंश आहेत. सिर्व ऐहिक व पारलौकिक सुखांपेक्षां आत्मसुख श्रेष्ठ व अधिक आहे असं येथें (अनुमानादि) तर्कानें दाखवितात-दरिद्री पुरुषांना अन्न, स्त्री, पुत्र यांपैकीं एखाद्याच विषयाची प्राप्ति झाली तरी तेवढाच आनंद होत असतो. हा झाला एक आनंद. मध्यम स्थितींतल्या पुरुषांना त्याहून एखाद्या अधिक विषयाची प्राप्ति झाली कीं, तितक्याच मानानें थोडा अधिक आनंद होतो. हे झाले दोन आनंद. ह्याप्रमाणेंच उत्तरोत्तर जशी जशी अधिक विषयप्राप्ति तसा तसा प्राण्याला अधिकाधिक आनंद होतो. न्यायानें पाहिलें असतां निष्कंटक सार्वभौम राज्य, सुंदर स्त्री, संतति, शरीरदृढता इत्यादि सर्व ऐहिक सुखानें संपन्न असलेल्या राजाचा एक मानुष आनंद होतो. त्या आनंदाहून पितरांचा एक आनंद शतपट अधिक असतो. ह्याप्रमाणें ब्रह्मलोकापर्यंत प्रत्येक लोकांतील आनंद शतपटीनें अधिक असतो. मृत्युलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्वहि आनंदाचा मिळून एक ब्रह्मानंद होतो. पूर्वोक्त सर्व वैषयिक सुखें हे या ब्रह्मानंदाचेच क्षुद्र अंश आहेत. अंशांहून अंशी श्रेष्ठ असतो हा न्याय; व हस्तपादादि अवयवांपेक्षा त्यांचा समूह जो देह तो श्रेष्ठ आहे असें लोक मानितात, हा व्यावहारिक अनुभव या प्रतिपादनाला प्रमाण आहे. सारांश ब्रह्मानंद सर्वांत श्रेष्ठ आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. जसा एकच आत्मा उपाधीच्या योगानें अनेक असल्यासारखा भासतो, तसाच परमानन्दहि विषसुखांच्या रूपानें क्षुद्रत्वानें प्रत्ययाला येतो. तसाच परमानन्दहि विषयसुखांच्या रूपानें क्षुद्रत्वानें प्रत्ययाला येतो. या श्लोकोक्त प्रतिपादनाला ‘‘स यो मनुष्याणां राद्धे’’ व अथैष ब्रह्मलोकः सम्राडिति’’इत्यादि श्रुति प्रमाण आहेत.] ७१