स्वप्ने भोगः सुखादेर्भवति ननु कुतः साधने मूर्च्छमाने
स्वाप्नं देहांतर तव्द्यवहृतिकुशलं नव्यमुत्पद्यते चेत् ।
तत्सामग्र्या अभावात्कुत इदमुदितं तद्धि सांकल्पितं चेत्तत्किं
स्वाप्ने रतांते वपुषि निपतिते दृश्यते शुक्रमोक्षः ॥७६॥
अन्वयार्थ-‘ननु साधने मूर्च्छमाने सति स्वप्ने सुखादेः भोगः कुतः भवति-’ अहो देहादि भोगसाधनें निश्चेष्ट पडलीं असतां स्वप्नांत सुखादिकांचा उपभोग (प्राण्याला) कसा होतो? ‘तव्द्यवहृतिकुशलं नव्यं स्वाप्नं देहान्तरं उत्पद्यते चेत् तत्सामगर्याः अभावात् इदं कुतः उदितं-’ स्वप्नांतील व्यवहाराला योग्य असें नवीनच दुसरें स्वाप्न शरीर उत्पन्न होतें असें जर म्हणशील तर देहोत्पत्तीची सामग्री नसतांना ते कसें उत्पन्न होतें? ‘तत् हि सांकल्पितं चेत् स्वाप्ने रतान्ते निपतिते वपुषि शुक्रमोक्षः किं दृश्यते-’ तें शरीर केवळ संकल्पमय आहे असें म्हणावें तर स्वप्नांतील स्त्रीसंभोगानंतर निश्चेष्ट पडलेल्या शरीरांत शुक्रपात झाल्याचें का दिसतें? आतां पूर्वपक्ष उघड करून आचार्य येथें स्वमत दृढ करितात. स्थूल देह सुखदुःखादि भोगाचें साधन आहे. तो साधनभूत देह ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांसह निश्चेष्ट होऊन पडला असतां स्वप्नामध्यें सुखदुःख देणार्या विषयांचा भोग कोणत्या साधनानें (देहानें) होतो? स्वप्नांतील विषयांचा उपयोग घेण्यास योग्य असा नवीनच दुसरा देह येथें उत्पन्न होतो व त्याच्या द्वारा स्वप्नांतील भोग होतात असें जर ह्मणशील तर त्या देहाच्या उत्पत्तीला लागणारी शुक्रशोणितादि सामग्री नसतांना तो कसा उत्पन्न होतो? पिशाचसंचाराप्रमाणें तो केवल कल्पनेनें खोटाच उत्पन्न होतो असें ह्मणशील तर स्वप्नावस्थेंतील स्त्रीसंभोगाच्या अंतीं ह्या निश्चेष्ट पडलेल्या देहांत रेतस्खलन कां होतें? त्या स्वप्नांतील खोट्या देहांतच कां होत नाहीं? कारण खोट्या देहाचा भोगहि खोटाच असणें युक्त आहे. मग स्त्रीसंभोगाचें द्योतक जें रेतस्खलन तें जागें झाल्यावर या निश्चेष्ट देहांत प्रत्यक्ष कां दिसतें] ७६