स्वर्गलोकीहुनी आले हे अभंग । धाडीयेले सांग तुम्हालागी ॥१॥
नित्यनेमे यासी पढता प्रतापे । जळतील पापे जन्मांतराची ॥२॥
तया मागे पुढे रक्षी नारायण । मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धीचा पालट नासेल कुमती । होईल सद्भक्ती येणे पंथे ॥४॥
सहज भक्ती झालिया सहज साक्षात्कार । होईल उद्धर पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणे इहपरलोकी । सत्य सत्य भाक माझी तुम्हा ॥६॥
परोपकारासाठी सांगितले देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
तेणे भव व्यथा जाईल तुमची । सख्या विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कथा धाडिली निशाणी । घारे ओळखोनी सज्जन हो ॥९॥
माझे दंडवत तुम्हा सर्व लोका । देहासहित तुका वैकुंठासी ॥१०॥
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल