घ्या गे कडेवर उचलून, बांधिला उखळी मधुसुदन । माय यशोदा करिते मंथन, दूध उताला जाईन म्हणून बघावयाला गेली निघून कृष्ण एकटा सोडून ॥१॥
डेरा धरूनी उभा राहिला पाहता पाहता उपडा केला, ताकाचा जो पाट वाहिला, लोण्या भराभर खाऊन ॥२॥
दूध उताला सर्वही गेले । लोणी पाहता शेष उरले, म्हणूनी हरीला उखळी बांधले, दावे गुराचे घेऊन ॥३॥
रांगत रांगत अंगणी आला । दो वृक्षांच्या मधूनी निघाला । जरी हरीसी उखळी बांधिला । उद्धरिले यमलार्जुन ॥४॥
आवाज ऐकूनी नंद धावला । गोपाळाचा मेळा जमला, केविलवाणा पाहूनी हरीला । माय हृदयी धरी उचलून । सोडिला उखळी मधुसुदन ॥५॥