मधु मागसी माझ्या सख्यापरी मधुघटचि रिकामे पडती घरी ॥धृ॥
आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजिला तुला भरोनी । सेवा ही पूर्वीची स्मरोनी करीन रोष सख्या दया करी ॥१॥
नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी । देवपूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगी कशी तरी ॥२॥
या तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज वृक्ष झर्यांचे गुढ मधुर कुज । संसाराचे मर्म हवे तुज मधु पिण्यापरी बळ न करी ॥३॥
ढळला रे ढळला दीन सखया संध्या छाया भिवविती हृदया । आता मधुचे नाव घ्यावया लागले नैत्र पैल तिरी ॥४॥