शुचिर्भूत होऊन श्रावणातल्या दर्श अमावास्येला दर्भ आणावेत. ते दर्भ ताजे राहतात, म्हणून पुनः पुनः तेच ब्रह्मकर्माला घ्यावेत. कोणी ग्रंथकार असे म्हणतात की, भाद्रपदी अमावास्येला दर्भ आणावेत. कुश, काश (लव्हाळा), यव (सात) दूर्वा, वाळा, कुंदक (कुंद), गहू, भात, मोळ (मोहोळाचे गवत), मुंज (या नावाचे गवत) असे दहा प्रकारचे दर्भ आहेत. (ही दहा प्रकारची गवतेच होत.)
'विरिञ्चिना सहोत्पन्न परमेष्ठि निसर्गज । नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव ॥'
असा पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे तोंड करून 'हुं फट्' असा मंत्र म्हणत एकेक दर्भ तोडून, ते सर्व आणावेत. ब्राह्मणाने चार दर्भाचे, क्षत्रियाने तीन दर्भचे व वैश्याने दोन दर्भाचे अशी पवित्रके घालावीत. किंवा सर्वांनीच दोन दोन दर्भाची घालावीत. पवित्रकांणा गाठ असली अथवा नसली तरी हरकत नाही. याप्रमाणे अनन्तोपाध्यायांचे पुत्र काशीनाथोपाध्याय यांनी रचिलेल्या धर्मसिंधुसारातल्या श्रावण महिन्याच्या निर्णयाचा उद्देश येथे संपला.