माणिक, गहू, गाय, तांबडे वस्त्र, गूळ, सोने, तांबे, रक्तचंदन व कमळ- ही दाने द्यावीत. चंद्राच्या शान्त्यर्थ-वेळूच्या भांड्यात तांदूळ, कापूर, मोती, पांढरे वस्त्र, तूप भरलेला कुंभ व बैल- ही त्याने द्यावीत. मंगळाच्या तृप्तीसाठी- प्रवाळ, गहू, मसुरा, तांबडा, बैल, गूळ, सोने, तांबडे वस्त्र व तांबे यांची दाने करावीत. बुधतापशमनार्थ निळे वस्त्र, सोने, कांसे, मूग, पाच, दासी, हस्तीदंत व पुष्पे-ही दाने द्यावीत. गुरूची तृप्त व्हावी म्हणून-पुष्पराग मणि, हळद, साखर, घोडा, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र, मीठ व सोने-ही दाने द्यावीत शुक्राच्या प्रियतेसाठी-रंगारंगाचे वस्त्र, पांढरा घोडा, गाय, हिरा, सोने, रुपे, गन्ध व तांदूळ ही दाने द्यावीत. शनीच्या पीडेच्या शमनार्थ- इंद्रनीलमणि, उडीद, तेल, तीळ, हुलगे, (कुलित्थ) म्हैस, लोखंड व काळी गाय- यांची दाने द्यावीत. राहुपीडाशमनार्थ -गोमेदमणि, घोड, निळे वस्त्र, कांबळा, तेल, तिल व लोखंड ही दाने द्यावीत. केतुपीडानिवारणार्थ वैडूर्यमणि, तेल, तीळ, कांबळा, कस्तुरी, मेंढा व वस्त्र-ही दाने करावीत. शनीची पीडा जाण्यासाठी शनिवारी तैलाभ्यंग करून तेलाचे दान करावे.