माघ वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्रि होय. ही निशीथव्यापिनी घ्यावी. रात्रींचा जो आठवा मुहूर्त तो निशीथकाल हे मागे सांगितलेच आहे. दुसर्या दिवशी जर अर्धरात्री व्याप्ति असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. पूर्व दिवशीच जर अर्धरात्री व्याप्ति असेल, तर पूर्व दिवसाचीच घ्यावी. अर्धरात्रव्याप्तीचा दोन्ही दिवशी जर अभाव असेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी. दोन दिवस संपूर्ण किंवा एकदेशी जर अर्धरात्रव्याप्ति असेल, तर पूर्व दिवसाची घ्यावी, असे हेमाद्रीच्या मतानुसार कौस्तुभात सांगितले आहे. व दुसर्या दिवसाची घेण्यास माधव, निर्णयसिंधु, पुरुषार्थचिंतामणि वगैरे बर्याच ग्रंथात लिहिले आहे. दुसर्या दिवशी निशीथकाळी जर एकदेशव्याप्ति असेल व पूर्व दिवशी निशीथकाळी जर पूर्णव्याप्ति असेल, तर पूर्व दिवसाचीच घ्यावी. पूर्व दिवशी निशीथकाळी जर एकदेशव्याप्ति असेल व दुसर्या दिवशी निशीथकाळी जर पूर्णव्याप्ति असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. रविवार किंवा मंगळवार व शिवयोग यांचा जर योग असेल, तर हे व्रत फार प्रशस्त होय.