विजयादशमी जर दुसर्या दिवशी अपराह्णव्यापिनी असेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. दोन दिवस जर अपराह्णव्यापिनी असेल आणि दोन्ही दिवशी जर श्रवणयोग असेल अथवा दोन्ही दिवशी तो नसेल, तर पहिल्या दिवसाचीच घ्यावी. दोन्ही दिवशी अपराह्णव्यापिनी नसून श्रवणयोग जरी असला अथवा नसला तरी, पूर्व दिवसाचीच घ्यावी. दोन दिवस अपराह्णव्यापिनी असेल अथवा दोन्ही दिवशी नसेल आणि त्यापैकी एक दिवस जर श्रवणयोग असेल, तर त्याच योगाची (श्रवणाची) घ्यावी. याप्रमाणेच अपराह्णकाळी एकदेशव्याप्ति असताही निर्णय जाणावा. पूर्व दिवशीच जर अपराह्नव्याप्ति असेल आणि दुसर्या दिवशी सहा घटिका इत्यादि व्याप्ति असून ती अपराह्णपूर्वीच संपत असेल, आणि त्या दिवशी जर श्रवणयोग असेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. कारण, अपराह्णी जरी व्याप्ति नाही, तरी, 'ज्या तिथीसह सूर्य उदय पावतो ती तिथि संपूर्ण होय' वगैरे सर्व वचनांनी ग्राह्य अशी जी सूर्योदयकाळी असलेली स्वल्प दशमी, ती जर श्रवणयुक्त असेल तर कर्मकाली आहे असे ठरते, आणि म्हणूनच ती ग्राह्य होय. निर्णयसिंधूत, दुसर्या दिवशी अपराह्णकाळी जर श्रवणनक्षत्र असेल तरच दुसर्या दिवसाची घ्यावी व श्रवणही जरी अपराह्णपूर्वीच समाप्त झाले असले तरी पूर्व दिवसाचीच घ्यावी, असे जे सांगितले आहे ते योग्यच आहे. केवळ दुसर्या दिवशीच जेव्हा अपराह्णव्याप्ति असेल आणि पूर्व दिवशीच जेव्हा केवळ अपराह्णानंतर सायाह्न वगैरे काळी श्रवणयोग असेल तेव्हा दुसर्या दिवसाचीच घ्यावी असे मला वाटते या विजयादशमीच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन, शमीपूजन व देशान्तरी यात्रा करण्यास निघण्याचे प्रस्थान ही करावीत असे सांगितले आहे. या पूजेचा प्रकारः- अपराह्णकाळी गावाच्या ईशान्येला जाऊन, शुद्ध स्थानी जमीन सारवून, गंधेत्यादिकांनी त्यावर अष्टदळ कमळ काढावे. मग
'मम सकुटुंबस्य क्षेमसिद्ध्यर्थं अपराजितापूजनं करिष्ये'
असा संकल्प करावा, नंतर अष्टदळ कमळाच्या मध्यभागी अपराजिता देवीचे 'अपराजितायै नमः' या मंत्राने आवाहन करावे. तिच्या दक्षिणभागी जया देवीचे 'क्रियाशक्त्यै नमः' या मंत्राने आवाहन करावे. वामभागी विजयादेवीचे 'उमायै नमः' या मंत्राने आवाहन करावे. नंतर
'अपराजितायै नमः । जयायै नमः । विजयायै नमः ।
या नाममंत्रांनी षोडशोपचारांची पूजा करून, प्रार्थना करावी. ती येणेप्रमाणे -
'इमां पूजां मया देवि यथाशक्तिनिवेदिताम् । रक्षार्थं तु समादाय व्रजस्व स्थानमुत्तमम् ॥'
राजाने संकल्पात - 'यात्रायां विजयसिद्ध्यर्थं' असा विशेष म्हणावा. पूजा करून नमस्कार केल्यानंतर
'हारेण तु विचित्रेण भास्वत्कनमेखला । अपराजिता भद्ररता करोतु विजयं ममं'
इत्यादि मंत्रांनी विजयाची प्रार्थना करून, पूर्ववत् विसर्जन करावे. याप्रमाणे संक्षेप जाणावा. नंतर सर्वजनांनी गावाच्या बाहेर ईशान्य दिशेला असलेल्या शमीच्या वृक्षाजवळ जाऊन, त्याची पूजा करावी. सीमोल्लंघन करणे ते शमीपूजनाच्या आधी किंवा नंतर करावे. राजाने घोड्यावर बसून, पुरोहित, आमात्य यांसह शमीवृक्षाच्या तळवटी जाऊन वाहनावरून खाली उतरावे. पुण्याहवाचन करून शमीची पूजा करावी. पूजेचा प्रकार -
'मम दुष्कृतामङ्लादिनिरासार्थं क्षेमार्थं यात्रायां विजयार्थंच शमीपूजां करिष्ये.'
शमी न मिळेल तर, 'अश्मंतकवृक्षपूजा करिष्ये'
असा संकल्प करावा. राजाने शमीच्या वृक्षाच्या मूळी दिक्पालांची व वास्तुदेवाची
'अमङ्लानां शमनी शमनी दुष्कृतस्य च । दुःखप्रणाशिनी धन्यां प्रपद्येऽहं शमी शुभाम् ॥'
या मंत्राने पूजा करावी. नंतर
'शमी शमयते पापं शमी लोहितकंटका । धरित्र्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥ करिष्यमाणयात्नायां यथाकालं सुखं मया । तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥'
अशी प्रार्थना करावी. अश्मंतकाचे जर पूजन असेल तर,
'अश्मंतक महावृक्ष महादोषनिवारण । इष्टानां दर्शनं देहि शत्रूणां च विनाशनम् ॥'
अशी प्रार्थना करावी. राजाने शत्रूची प्रतिमा करून, तिला शस्त्राने छेदावी. प्राकृत लोक जे शमीच्या फांद्या तोडून आणतात, त्याला कोठे आधार नाही. 'शमीच्या मुळाजवळची ओली माती अक्षतायुक्त घेऊन ती गीतवाद्यांच्या निर्घोषांत आपल्या घरी आणावी. नंतर अलंकारवस्त्रादिक स्वजनांसह धारण करावीत. सौभाग्यवती स्त्रियांना नीरांजन ओवाळल्यावर घरात यावे. देशांतराला जाणारांनी विजयमुहुर्तावर चंद्रादिकांची जरू अनुकुलता नसली, तरी बेलाशक गमन करावे. हा विजयमुहूर्त दोन प्रकारचा आहे.
१ किंचित संध्याकाळ उलटल्यावर, नक्षत्रे थोडी जरी दिसू लागली तरी जो काल येतो, तो विजयकाल होय. हा सर्व कार्यांची सिद्धि देणारा आहे.
२. अकरावा मुहूर्त हा देखील काल होय. सर्व विजयेच्छूंनी या मुहूर्तावरच प्रयाण करावे. या दोहोंपैकी दशमीने युक्त अशा एका मुहूर्तावर प्रस्थान करावे; एकादशीयुक्त मुहूर्तावर करू नये आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणतात. ही सर्व कर्मांना शुद्ध आहे. या प्रयाणासाठी तर ही विशेषच शुभ आहे. श्रवणनक्षत्रयुक्त असेल तर महान योग होय, असे ज्योतिषग्रंथात वचन असल्यामुळे जी कर्मै अमुकच महिन्यात करण्याबद्दल करण्याचा निर्बंध नाही अशी इतर कर्मे देखील चंद्रादिकलांची अनुकूलता नसतांही या तिथीवर करावीत. चूडाकर्म, विष्णु वगैरे देवतांचे प्रतिष्ठापन वगैरे जी कर्मे काही विशिष्ट मासात करावयाला सांगितले आहे, ती मात्र या दिवशी करू नयेत. राजाच्या पट्टाभिषेकाविषयी, नवमीविद्ध अशी जरी दशमी असली, तरी ती न घेता सूर्योदयी व्याप्ति असणारीच घ्यावी.