या व्रताचा उपवास सूर्याच्या उद्देशाने करून, देवदारु, वाळा, वेलची, मनशीळ, पद्मकाष्ठ व तांदूळ हे पदार्थ मध आणि गाईचे तूप यांत वाटून त्याचा दुधामध्ये कालवून तयार केलेला कल्क अंगाला लावून स्नान करावे. स्नानाचा मंत्र -
'आपस्त्वमसि देवेश ज्योतिषां पतिरेव च । पापं नाशय मे देव वाङ्मनःकायकर्मजम् ॥'
या स्नानानंतर पंचगव्याने स्नान करावे आणि पंचपल्लवांनी (अश्वत्थ, वड, उंबर, आंबा व पायरी यांची पाने) मार्जन केल्यावर मृत्तिकास्नान करावे. तर्पण वगैरे नित्यविधि करून वरुणाची पूजा करावी. सर्वतोभद्र मंडळाच्या मध्यभागी कलशावर तांदुळाने भरलेले पूर्ण पात्र ठेवून तांदुळाचे कमळ करावे. त्याच्या आठ पाकळ्यांच्या ठिकाणी, पूर्वेकडून आरंभ करून सूर्य, तपन, स्वर्णरेतस, रवि, आदित्य, दिवाकर, प्रभाकर व सूर्य यांचे आवाहन केल्यावर, मध्यभागी सुवर्णाच्या रथावर सूर्य व त्याच्या अग्रभागी वरुण यांचे आवाहन करावे. कण्हेर, रुई वगैरे फुलांनी व धूपदीपांनी पूजा करावी. दिक्पाला इत्यादि देवतांची पूजा करून, सुर्याला बारा अर्घ्य द्यावे. सविस्तर पूजाविधि व बारा अर्घ्याचे मंत्र कौस्तुभात पहावेत. नंतर सुर्यापुढे
'प्रभाकर नमस्तुभ्यं संसारान्मां समुद्धर । भक्तिमुक्तिप्रदो यस्मात्तरस्माच्छाति प्रयच्छ मे ॥
नमो नमस्ते वरद ऋक्सामयजुषांपते । नमस्तु विश्वरूपाय विश्वधात्रे नमोस्तुते" ॥
या मंत्रांनी प्रार्थना करावी. नंतर 'उदुत्यं' इत्यादि सौर सूक्तांचा जप करून, रात्री जागरण करावे. प्रातःकाळी 'आकृष्णेन०' या मंत्राने, रुईच्या समिधा, चरु, आज्य व तीळ यांचा प्रत्येकी १०८ याप्रमाणे होम करून, घंटा इत्यादि सर्व अलंकारांनी युक्त असलेल्या कपिला गाईचे मंत्रांनी पूजन करावे, आणि ती ब्राह्मणाला दान द्यावी. गोपूजेचे मंत्र कौस्तुभात पहावेत. दानाचा मंत्रः -
'नमस्ते कपिले देवि सर्वपापप्रणाशिनि । संसारार्णवमग्नं मां गोमातस्त्रातुमर्हसि ॥'
दोन वस्त्रांनी आच्छादित व घंटादिकांनी युक्त वगैरे विशेषणांचा उच्चार करून
'इमां मां तुभ्यमहं संप्रददे' असे म्हणून गाय दान द्यावी. दानाबरोबर सुवर्णदक्षिणा द्यावी. त्यानंतर त्या ब्राह्मणाला रथ व सूर्याची प्रतिमा द्यावी. त्याचे मंत्र -
'दिव्यमूर्तिजगच्चक्षुर्द्वादशात्मा दिवाकरः । कपिलासहितो देवो मम मुक्तिप्रयच्छतु ॥ यथा त्वं कपिले पुण्या सर्व लोकस्य पावनी । प्रदत्ता सह सूर्येण मममुक्तिप्रदाभव ॥
वगैरे. या नंतर कपिला गाईची प्रार्थना करावी. त्याबद्दलची माहिती कौस्तुभात पहावी. अथवा उपोषण, जागरण होम वगैरे विधि न करिता, षष्ठीच्याच दिवशी स्नान, रथादिकांचे पूजन, कपिला गाईचे दान वगैरे करावे. याप्रमाणे संक्षेपाने कपिलाषष्ठी व्रताचा विधि सांगितला.
'इति श्रीमदनन्तोपाध्यायसूनुकाशीनाथोपाध्यायविरचिते धर्मसिन्धुसारे भाद्रपदमासकृत्यनिर्णयोद्देशः॥'