प्रतिपदेला प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून, केशर चंदन इत्यादिकांचा तिलक लावावा. हातात पवित्रक घालावे. दहा घटकांच्या परिमितकाळी अथवा अभिजिन्मुहूर्ती पत्नीसह देशकालादिकांचा उच्चार करून,
'मम सकुटुंबस्यामुकदेवता प्रीतिद्वारा सर्वापच्छान्तिपूर्वक दीर्घायुर्धनपुत्रादिवृद्धिशत्रुजयकीर्तिलाभप्रमुखचतुर्विधपुरुषार्थसिद्ध्यर्थमध्यप्रभृति महानवमीपर्यन्त प्रत्यहं त्रिकालमेककालं वामुकदेवता पूजामुपवासनक्तैक भक्तान्यतमनियमसहितामखंडदीपप्रज्वालनं कुमारीपूजनं चण्डीसप्तशतीपाठं सुवासिन्यादिभोजनमित्यादि यावत्कुलाचारप्राप्तमनूद्य एवमादिरूपं शारदनवरात्रोत्सवाख्यं कर्म करिष्ये ।'
असा संकल्प करावा. गणपतिपूजन, पुण्याहवाचन आणि चण्डी व सप्तशती यांच्या पाठासाठी ब्राह्मणवरण-ही केल्यावर, घटस्थापना जर करायची असेल, तर
'मही द्यौ०' या मंत्राने भूमीला स्पर्श करून, तीवर अंकुर रुजण्यासाठी शुद्ध मृत्तिका घालावी. 'ओषधयः सं०' त्या मंत्राने त्या मृत्तिकेमध्ये यव वगैरे टाकावे. 'आकलशेषु०' या मंत्राने कलश ठेवून, तो 'इमं मे गङ्गे०' या मंत्राने उदकाने भरावा. 'गंधद्वारा' या मंत्राने त्यात गंध घालावे. 'या ओषधी०' या मंत्राने (कुष्टमांसी, हळद, आंबेहळद, वेखंड, चंपक, चंदन, दगडफूल, नागरमोथा, मुरा) या सर्व ओषधी कलशांत ठेवाव्या.
'काण्डात्काण्डात०' या मंत्राने कलशांत दूर्वा ठेवाव्या. 'अश्वत्थेव०' या मंत्राने पंचपल्लव कलशांत ठेवावे. 'स्योना पृथिवी' या मंत्राने (हत्ती, अश्व, राजद्वार, वारूळ, चवाठा, सरोवर व गोठा या सात ठिकाणच्या) सप्तमृत्तिका कलशांत घालाव्या. 'याःफलिनीः' या मंत्राने कलशात फल ठेवावे. 'सहिरत्नानि०' या मंत्राने (सोने, हिरा, पोवळे, मोत्ये व नीळ) आणि 'हिरण्यरूप०' या मंत्राने सुवर्ण, ही कलशात ठेवावीत. नंतर 'युवासुवसा' या मंत्राने कलशाला सूत्राचे वेष्टन करून, 'पूर्णा दर्वी०' या मंत्राने त्यावर पूर्ण पात्र ठेवावे आणि 'तत्त्वायामि' या मंत्राने वरूणाची पूजा करावी. नंतर त्या कलशावर आपल्या कुलदेवतेची प्रतिमा ठेवून, तिची पूजा करावी. किंवा कुलदेवतेच्या प्रतिमेची स्वस्थानीच स्थापना करून पूजा करावी ती येणेप्रमाणे-
'जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ॥
आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदिनि ।
पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये ॥
या मंत्रांनी व पुरुषसूक्त आणि श्रीसूक्त यांच्या प्रथम ऋचांनी आवाहन करून, 'जयन्तीमङ्गला काली०' या मंत्राने व सूक्ताच्या ऋचांनी षोडशोपचार पूजा करावी. 'सर्व मङ्गल माङ्गल्ये०' इत्यादि मंत्रांनी प्रार्थना करावी. दररोज बलिदान करण्याचा जर पक्ष असेल, तर माष-(उडीद) मिश्रित भाताचा किंवा कूष्मांडाचा (कोहोला) बळी द्यावा. किंवा फक्त शेवटच्याच दिवशी बलिदान द्यावे, किंवा मुळीच देऊ नये. त्यानंतर 'अखंडदीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् । उज्ज्वालये अहो रात्रमेकचित्तो धृतव्रतः ॥'
या मंत्राने अखंडदीपाची स्थापना करावी.