भाद्रपद शुक्ल द्वादशी दोन घटिका किंवा त्याहूनही कमी असून, तिच्याशी जर श्रवण नक्षत्राचा योग होत असेल, तर ती घ्यावी. त्या दिवशी उपोषण करावे. उत्तराषाढा नक्षत्राने विद्ध अशा श्रवण नक्शत्राचा निषेध असल्याबद्दल जी वाक्ये आहेत ती निर्मूल जाणावी. जेव्हा पूर्व दिवशी एकादशीने विद्ध द्वादशी असून ती दुसर्या दिवशीही असेल व दोन्ही दिवशी श्रवण नक्षत्राचा योग असेल तेव्हा पूर्व दिवशी एकादशी, द्वादशी व श्रवण असा तिघांचा योग होतो. याला विष्णुशृंखल योग म्हणतात. करिता या पूर्व दिवशीच उपवास करावा. या विषयी उदाहरण- एकादशी १८, उत्तराषाढा ६, द्वादशी २०, श्रवण १२. अथवा एकादशी १८, उत्तराषाढा २५, द्वादशी २०, श्रवण. १८ या दुसर्या उदाहरणामध्ये एकादशीला श्रवणयोग नाही. तरी श्रवणयुक्त द्वादशीच्या स्पर्शमात्रानेच विष्णुशृंखल योग होतो. हा दोन्ही प्रकारचा योग दिवसासच ग्राह्य आहे, रात्री नाही असे पुरुषार्थ चिंतामणीमध्ये सांगितले आहे. रात्री देखील मध्यरात्रीनंतर योग असेल तर तो ग्राह्य आहे असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरापर्यंत तिथींचा श्रवण योग ग्राह्य आहे, दुसरा इत्यादि प्रहरांचे ठिकाणी नाही असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. याविषयी दुसरा पक्षच युक्त आहे असे मला वाटते. या विष्णुशृंखल योगाचे ठिकाणी दोन व्रतांचे उपोषण तंत्राने एकादशीचे दिवशीच करून द्वादशीला पुढे सांगितलेल्या पारणेच्या निर्णयाला अनुसरून पारणा करावी. जेव्हा वर सांगितलेला विष्णुशृंखल योग नसेल तेव्हा शुद्धाधिका द्वादशीचे दोन्ही दिवशी श्रवण योग असेल आणि पूर्व दिवशी उदयकाली श्रवण योग नसेल तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. जेव्हा दोन्ही दिवशी द्वादशीला सूर्योदय काली श्रवणयोग असेल तेव्हा पूर्व दिवसाचीच घ्यावी. विद्वाधिका द्वादशीचे ठिकाणी देखील, दुसर्या दिवशी उदयकाली अथवा उदयानंतर श्रवणयोग असेल तरी दुसर्या दिवसाचीच घ्यावी हे निर्विवाद आहे. दोन्ही दिवशी श्रवणयोग असेल तर वर सांगितलेला विष्णुशृंखलयोग असल्यास पूर्व दिवसाची, नाही तर दुसर्या दिवसाची घ्यावी असे जाणावे. याप्रमाणे जेव्हा एकादशीव श्रवण द्वादशी यांचा उपवास लागोपाठ प्राप्त होईल तेव्हा सशक्त असेल त्याने दोन उपवास करावे; कारण दोन्ही व्रते नित्य आहेत दोन्ही व्रतांच्या देवता एक आहेत, याकरिता पारणालोपाचा दोष नाही. दोन उपवास करण्याविषयी आपण असमर्थ आहो असे जो एकादशीव्रताचा संकल्प करण्यापूर्वी जाणतो त्याने एकादशीचे दिवशी फलादिकांचा आहार करून द्वादशीला निरशन करावे. याने एकादशी व्रताचा लोप होत नाही. कारण श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशीचे दिवशी जो मनुष्य उपवास करतो त्याला एकादशीचे उपावासापासून प्राप्त होणारे पुण्य मिळते असे नारदाचे वचन आहे. द्वादशी श्रवणनक्षत्राने युक्त असल्यास त्या दिवशी वैष्णव व स्मार्त यांनी उपोषण करावे व एकादशीच्या उपोषणाचा त्याग करावा, असे माधवाचेही वचन आहे. या ठिकानी एकादशीच्या उपोषणाचा त्याग म्हणजे फलाहार करावा असे जाणावे, भोजन करावे असा बोध नाही. दोन्ही उपवास करण्याचे असामर्थ्य ज्याच्या अनुभवास येते त्याने एकादशीचे दिवशी उपवास करून द्वादशीचे दिवशी विष्णूचे पूजन करून पारणा करावी. या ठिकाणी व्रताचे अंगभूत पूजन केल्यानंतर दुसरा उपवास करण्याला असमर्थ असेल त्याने "उपवासप्रतिनिधिरूपं विष्णुपूजनं करिष्ये" असा संकल्प करून पुन्हा पूजन करावे. या द्वादशीचे दिवशी श्रवणयोगाचा अभाव असून व एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर एकादशिचे दिवशी श्रवण द्वादशीव्रत करावे. विद्धा एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर एकादशीचे दिवशी श्रवण द्वादशीव्रत करावे. विद्धा एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर ज्यांची त्या दिवशी एकादशी असेल त्यांना तंत्राने दोन उपवासांची सिद्धि होते. श्रवण द्वादशी व्रत घेतलेल्या इतरांना दोन उपवास केले पाहिजेत. दोन उपवास करण्याला अशक्त असतील त्यांनी पूर्व दिवशी फलाहार करून दुसर्या दिवशी निरशन करावे असे मला वाटते.