बाप, आजा आणि पणजा यांपैकी कोणी जर शस्त्र, विष, अग्नि, जल, शिंगाचे प्राणी, वाघ, सर्प, विद्युत्पात वगैरे निमित्तांच्या दुर्मरणांपैकी कशानेही मरण पावला असेल, तर एकोद्दिष्टविधीने श्राद्ध करावे. बाप व आजा यांचे मृत्यु जर शस्त्रादिकांनी झाले असतील तर दोन एकोद्दिष्टे करावीत. तिघेही शस्त्रादिकांनी मृत्यु पावले असल्यास पार्वणच करावे. तीन एकोद्दिष्टे करावीत, असेही काही ग्रंथकारांचे मत आहे. सहगमन, प्रयाग वगैरे ठिकाणि विधिप्राप्त असे अग्नि, जल वगैरेपासून जर मृत्यु आला असेल तर चतुर्दशीश्राद्ध करू नये. प्रायोपवेशन म्हणजे जे उपवास करून स्वेच्छेने मरण पावणे ते, आणि युद्ध यांनी जर विधिप्राप्त मृत्यु आला असेल तर चतुर्दशीश्राद्ध करावे. या श्राद्धाने निपुत्रिक चुलता, भाऊ वगैरेंचे देखील एकोद्दिष्ट करावे हे श्राद्ध धूरिलोचन नावाच्या विश्वेदेवांसह करावे. संबंध, गोत्र नाव इत्यादिकांचा उच्चार करून,
'अमुकनिमित्तेन मृतस्य चतुर्दशीनिमित्तमेकोद्दिष्टंश्राद्धं सदैवं सपिंडं करिष्ये'
असा संकल्प करावा आणि प्रत्येक उद्दिष्टाला एक अर्घ्य, एक पवित्रक व एक पिंड यांनी युक्त असे श्राद्ध करावे. पित्रादि अथवा भ्रात्रादि यांपैकी जर कोणी शस्त्रापासून मृत झाला असेल, तर महालयाप्रमाणे निराळा पाक करून, अथवा सहतंत्राने दोन एकोद्दिष्टे करावीत. याप्रमाणे चतुर्दशीच्या दिवशी एकोद्दिष्ट करून बाप वगैरे सर्व पितृगणांच्या उद्देशाने इतर तिथीचे दिवशी सकृन्महालय अवश्य करावा. या चतुर्दशीच्या दिवशी शस्त्रादिकांपासून मृत झालेल्या मातापितरांचा जर मृत्युदिन असेल, तर चतुर्दशीश्राद्धानिमित्त एकोद्दिष्ट करून त्याच दिवशी पुन्हा मृताच्या त्रयीच्या उद्देशाने सांवत्सरिक श्राद्ध पार्वणविधीने करावे असे श्राद्धसागरग्रंथात सांगितले आहे. सांवत्सरिक श्राद्धाच्या पार्वणानेच चतुर्दशीश्राद्धाची सिद्धी होते, ते निराळे करायला नको, असे कौस्तुभ वगैरे ग्रंथातून सांगितले आहे. इतर दिवशी सकृन्महालय करावा. या चतुर्दशीश्राद्धाला काही विघ्न आल्यास, याच पक्षात अथवापुढील पक्षात इतर कोणत्या तरी दिवशी, हे श्राद्ध पार्वणविधीनेच करावे, एकोद्दिष्ट करू नये. या श्राद्धाच्या एकोद्दिष्टाविषयी अपराह्णव्यापिनी चतुर्दशीच घ्यावी. इतर एकोद्दिष्टांप्रमाणे मध्याह्नव्यापिनी तिथि घेऊ नये, असे कौस्तुभात सांगितले आहे.