ज्याला आग्रयण करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने प्रकृतीष्टीशी समान अशा आग्रयणाचा प्रयोग करावा. पौर्णिमेष्टीबरोबर समानतंत्राने आग्रयण करताना, आग्रयणाचे मुख्य कर्म आधी करून मग प्रकृतीष्टीचे मुख्य कर्म करावे. दर्शेष्टीबरोबर समान तंत्राने (आग्रयणकर्म) करताना, आधी दर्शेष्टीचे मुख्य कर्म करून, मागून आग्रयणाचे प्रधानकर्म करावे. आधीची व नंतरची इतर सारी कर्मे आग्रयणविकृतीसंबंधाचीच करावीत. कारण 'कर्मविरोध असता विकृतितंत्र करावे' असा सिद्धांत आहे. हे करणे शक्य नसल्यास राळे, तांदूळ व यव यांचा पुरोडाश (पिठाचा लाडू) करून, दर्शपौर्णमास स्थालीपाक करावे, किंवा नवे तांदूळ घेऊन त्यांचा अग्निहोत्रहोम करावा, अथवा अग्निहोत्राच्या गाईकडून नवी अन्ने खाववून, तिच्या दुधाने अग्निहोत्र होम करावा. हे आग्रयण अधिक महिन्यांत करू नये. गुर्वादिकांच्या अस्तांतही हे आग्रयण करू नये, असेही काही ग्रंथकारांचे म्हणणे आहे. जुने धान्य मिळेनासे झाल्यास अधिक महिन्यांतही करावे.
असामेवपौर्णमास्यां ज्येष्ठापत्यनीराजनादिकं परविद्धाया कार्यम् ।