सूर्य हस्तनक्षत्री असता, चंद्र हस्तनक्षत्राने युक्त अशा अमावास्येला गजच्छाया असे नाव आहे. या दिवशी श्राद्धदानादि कर्मे करावीत. याप्रमाणे, अमावास्येच्या दिवशी गजच्छायापर्वणिचा निर्णय सांगितला. आश्विन शुद्ध प्रतिपदेला दौहित्राने म्हणजे मुलीच्या मुलाने, त्याचे जरी उपनयन (मुंज) झाले नसले, तरीही मातुल (मामा) जिवंत असतानाही सपत्नीक मातामहाचे (आईच्या बापाचे) पार्वणश्राद्ध अवश्य करावे. आईची आई जर जिवंत असेल, तर फक्त मातामहपार्वण करावे. हे श्राद्ध ज्याचा बाप जिवंत आहे अशानेच करावे. हे सपिंडक अथवा अपिंडक केले तरी चालते. या श्राद्धाला पुरूरवार्द्रनावाचे विश्वेदेव घ्यावेत. कोणी ग्रंथकार धूरिलोचन घ्यावेत असेही म्हणतात. ही प्रतिपदा अपराह्णव्यापिनी घ्यावी असे अनेक ग्रंथकारांचे म्हणणे आहे. संगवकालव्यापिनी घ्यावी असेहि काही ग्रंथकारांचे मत आहे. या श्राद्धाचा गौण काल, सूर्य वृश्चिकराशीला जाईपर्यंत आहे, असे कालतत्वविवेचन नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. याप्रमाणे महालयादिकांच्या निर्णयाचा उद्देश आहे.