नंतर अपराह्णकाळी मार्गपालीबंधन करावे. कुश किंवा मोळ यांचा परिपाठाप्रमाणे मोठा दोर वळून पूर्वदिशेकडे खांबाला व झाडाला बांधावा आणि
'मार्गपालि नमस्तेस्तु सर्वलोकसुखप्रदे । विधेयैः पुत्रदाराद्यैः पुनरेहि व्रतस्यमे ॥
याप्रमाणे त्याची प्रार्थना करून त्याला नमस्कार करावा. नंतर त्या दोराच्या खालून गाई व हत्ती यासह ब्राह्मण, राजा वगैरे सर्वांनी जावे. त्यानंतर मोळ वगैरे गवताचा एक भक्कम दोर तयार करून, त्याचे एक टोक राजपुत्रांनी व दुसरे हीन जातीच्या लोकांनी धरून, ते दोहींकडून दोघांनी कोणास जय मिळेल ते समजण्यासाठी ओढावे. त्यात जर हीन जातीयांचा जय झाला तर राजाचा जय होणार असे समजावे. या दिवशी सकाळी द्यूत खेळावे हे मागे सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी नीरांजन ओवाळणे तेही सकाळीच ओवाळावे. रात्री गाण्याबजावण्याचा उत्सव करावा व ब्राह्मण, आप्त, वगैरेंचा नव्या वस्त्रांनी सत्कार करावा.