पहिल्या प्रहरी मूलमंत्र म्हणून 'श्रीशिवाय आसनं समर्पयामि' असे म्हणून शिवनामाने सर्वोपचार करावेत. दुसर्या प्रहरी 'शिवरात्रौद्वितीययामपूजां करिष्ये' असा संकल्प करून, 'श्रीशंकराय आसनं समर्पयामि' असे म्हणून शंकरनामाने सारे उपचार अर्पण करावेत. तिसर्या प्रहरी 'तृतीयद्याम पूजां करिष्ये' अशा संकल्पानंतर 'श्रीमहेश्वराय आसनं समर्पयामि' असा उच्चार केल्यावर, पूजा करावी. चौथ्या प्रहरी तैलाभ्यंग, पंचामृत, उष्णोदक व गंधोदक यांचा अभिषेक करावा. यज्ञोपवीत अर्पण केल्यावर गोरोचन, कस्तुरी, कुंकू, कापूर, अगरु व चन्दन यांनी मिश्रित अशा गंधाने (शिव) लिंगावर लेपन करावे. हे अनुलेपनाचे सर्व सामान मिळून २५ तोळे वजन असावे; हे अनुलेपनाचे प्रमाण होय. इतक्या प्रमाणाचे अनुलेपन करणे अशक्य असल्यास, ते यथाशक्ति करावे. धोत्रा व कण्हेर यांची फुले व बिल्वदळे यांनी पूजा करणे सर्वोत्तम होय. फुले मिळत नसल्यास साळी, तांदूळ, गहू व सातू यांनी पूजा करावी. नैवेद्यानंतर मुखवासासाठी विडा द्यावा. विड्याचे पान सुपारी व शिंपांचा चुना या तिहींचा विडा होतो. त्यातच खोबरे, कापूर, वेलदोडा व कंकोळ यांचे मिश्रण असले म्हणजे त्याला मुखवास असे म्हणावे. वरील वस्तूपैकी एखादी वस्तु जर नसेल तर त्याचे शहाण्याने स्मरण करावे. सर्वपूजा झाल्यावर जी प्रार्थना करावी, ती अशीः -
नित्य नैमित्तिकं काम्यं यत्कृततं मया शिव ।
तत्सर्वं परमेशान मया तुभ्यं समर्पितम् ॥
नंतर, 'शिवरात्रीव्रतं देव पूजाजपरायणः ।
करोमि विधिवद्दत्तं गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥'
या मंत्राने अर्घ्य द्यावे. याप्रमाणे चारी अर्घ्यांची माहिती कौस्तुभात पहावी. दुसर्या दिवशी सूर्योदयी स्नान करून, पुन्हा शिवपूजा केल्यावर, पूर्वी सांगितलेल्या बारा नावांनी बारा ब्राह्मणांची किंवा सामर्थ्य नसल्यास, एका ब्राह्मणाची पूजा करून, तिल व शिजलेले अन्न यांनी भरलेले बारा कुंभ अथवा एकच कुंभ द्यावा. व
'यन्मयाद्यकृतंपुण्यं तद्रुद्रस्य निवेदितम् ॥
त्वत्प्रसादान्महादेव व्रतमद्य समर्पितम् ।
प्रसन्नो भव मे श्रीमन्सद्गतिः प्रतिपाद्यताम् ।
तवदालोकनमात्रेण पवित्रोऽस्मि न संशयः'
या मंत्राने शिवाला व्रतार्पण करावे. नंतर ब्राह्मणभोजन करून पूर्वी निर्णय सांगितलेल्या वेळी इष्टमित्रासह जे पारणे करावे, त्याचा मंत्रः -
'संसारक्लेशदग्धस्य व्रतेनानेन शंकर ।
प्रसीद सुमुखोनाथ ज्ञानदृष्टिप्रदोभव ॥'
असा शिवरात्रिव्रताचा विधि आहे.