ब्राह्मणाने 'यजमानेन वृतोऽहं. चण्डीसत्पशतीपाठ नारायण ह्रदयलक्ष्मीह्रदयपाठंवा करिष्ये'
असा संकल्प करून आसनादिक विधि करावा. लिहिलेले पुस्तक पीठावर स्थापन करून, नारायणाला
'नमस्कार करून आरंभ करावा; असे वचन असल्याने
'ॐ नारायणाय नमः । नराय नरोत्तमाय नमः । देव्यै सरस्वत्यै नमः । व्यासाय नमः ।
याप्रमाणे नमस्कार करून, ॐकाराचा उच्चार करावा, आणि सर्व पाठ झाल्यानंतरही ॐकाराचा उच्चार करावा.
पुस्तक वाचण्याचे नियम - हातात पुस्तक धरू नये. स्वतः लिहिलेले अथवा ब्राह्मणेतराने लिहिलेले पुस्तक निष्फल होय. अध्याय समाप्त झाल्यावर थांबावे. मध्ये थांबू नये. थांबल्यास तो अध्याय पुन्हा पहिल्यापासून वाचावा. ग्रंथाचा अर्थ जाणून अक्षरांचा स्पष्ट उच्चार करीत, फार जलद नाही व फार सावकाश नाही अशा तर्हेने-रस, भाव आणि स्वर यांनी युक्त असे वाचन करावे. धर्म, अर्थ आणि काम यांची इच्छा करणाराने चण्डीपाठ सर्वदा करावा. 'म्हणून माझे हे माहात्म्य स्थिरचित्त होऊन, पठन करावे व सदा भक्तीने श्रवण करावे' असे या बाबतीत (देवीचे) वचन असल्याने, नैमित्तिक पाठ करण्यासहि सांगितले आहे. 'सर्व शान्तिकर्मात, दुःस्वप्न पाहिले असता व उग्र ग्रहांची पीडा होत असता, माझे माहात्म्य श्रवण करावे.' 'तसेच अरण्यात शून्यस्थानी दावाग्नीने वेष्टित दस्यूंनी वेढा दिला असता, किंवा, शत्रूंनी शून्यस्थानी धरलेला इत्यादि संकटे असता, तसेच सर्व प्रकारच्या उग्र बाधा अथवा वेदना यांनी त्रस्त झाला असता, मनुष्याने हे माझे माहात्म्यस्मरण करावे, म्हणजे संकटमुक्ति होते' असे वचन आहे. उपद्रवाच्या नाशासाठी तीन पाठ करावेत. ग्रहांच्या पीडाशमनार्थ पाच, शान्ति व वाजपेय यज्ञाची फलप्राप्ति होण्यासाठी नऊ, राजा वश होण्यासाठी अकरा, शत्रुनाशनार्थ बारा, स्त्रीपुरुषांच्या वशीकरणार्थ चौदा, सौख्य व लक्ष्मी यांच्या प्राप्त्यर्थ पंधरा, पुत्रपौत्रधनधान्यासाथी सोळा, राजभयनाशनार्थ सतरा, उच्चाटनार्थ अठरा, वनभयनाशनार्थ वीस, बंधमुक्ततेकरिता पंचवीस, दुर्धर रोग, कुलोच्छेद, आयुर्नाश, शत्रूची वृद्धि, रोगवृद्धि, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक उत्पात वगैरे महासंकटनाशनार्थ व राज्यवृद्धीसाथी शंभर याप्रमाणे अनुक्रमे पाठ करावेत. हजार पाठ केल्यास शंभर अश्वमेधांचे फल, सर्व मनोरथांची सिद्धि आणि मोक्ष ही प्राप्त होतात, असे वाराही तंत्रात सांगितले आहे. सर्वत्र काम्यपाठ करताना, प्रथम संकल्पपूर्वक पूजन करून, अंती बलिदान करावे. या नवरात्रात कुलाचार असल्यास वेदपारायणहि करावे. वेदपारायणाचा विधि बौधायनाने सांगितलेला आहे, तो कौस्तुभात पहावा.