पुराण सांगायला आदराने ब्राह्मणाला बोलवावा. इतर वर्णीयाला बोलावू नये. ऐकणार्यात ब्राह्मणाला पुढे करून चारी वर्णांना ते ऐकावे. पुराण वाचणार्याने स्पष्ट, सावकाश उच्चार करीत, शांत चित्ताने, अक्षरे, पदे, कला, स्वर, रस व भाव यांनी युक्त असे वाचावे. हे राजा, ब्राह्मणादि सर्व वर्णांना त्याचा अर्थ सांगावा. अशा प्रकारे जो ब्राह्मण पुराण वाचतो त्याला व्यास असे म्हणतात. पुराणे वाचणे संपल्यावर वाचकाची यथाशक्ति संभावना करावी. जो वाचकाची पूजा करतो, त्याला देवता प्रसन्न होतात. वाचक ज्याच्या घरी श्राद्धात जेवतो, त्याचे पितर शंभर वर्षैपर्यंत तृत होतात, असे वचन आहे. पुत्रेच्छूने कार्तिकस्नानकाळी काशीखंडात सांगितलेले अभिलाषाष्टक म्हणावे. याच दिवशी दुग्धव्रताची समाप्ति करून दुग्धदान द्यावे. व द्विदलव्रताचा संकल्प करावा. या (द्विदलाच्या) बाबतीत उत्पत्तिकाळी ज्यांची दोन दळे दिसतात ती वर्ज्य करावीत असे जरी काहींचे मत आहे, तरी असे लक्षण मानण्यास कोठेच वचन नसल्याने, स्वरूपतः जी द्विदल दिसतात तेवढीच वर्ज्य करावीत आणि बाकीची करू नयेत. कित्येक म्हणतात की, पाने, फुले वगैरेही वर्ज्य करू नयेत. याचप्रमाणे आणखी काही असे सांगतात की, विडा, हजामत वगैरे वर्ज्य करणे ही व्रतेच समजावीत. या महिन्यात आकाशदिवा (आकाशदीप) लावण्यास सांगितला आहे. घरापासून जवळच एक पुरुष उंचीचे (साडेतीन हात) यज्ञीय लाकूड घेऊन, ते जमिनीत पुरून उभे करावे. त्याच्या शेंड्यावर अष्टदलादि आकृतीचे तयार केलेले चक्र टांगून, त्याच्या मध्यभागी मुख्य दिवा आणि त्याच्या भोवती आठ दिवे
'दामोदराय नभसि तुलायां दोलया सह । प्रदीपं ते प्रय्च्छामि नमोऽनन्ताय वेधसे'
या मंत्राने लावून, तो आकाशदीप देवाला अर्पण करावा. याप्रमाणे सबंध कार्तिकाचा महिना रोज आकाशदिवा लावल्याने पुष्कळ संपत्ति मिळते.