कार्तिक वद्य अष्टमीला कालाष्टमि असे म्हणतात. (ज्या ठिकाणी वद्य प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत महिना मोजण्याची पद्धति आहे तेथे आधी कृष्णपक्ष येतो म्हणून) पौर्णिमांतमासाच्या दृष्टीने ही कार्तिक वद्य अष्टमी होते. ही माध्याह्नव्यापिनी घ्यावी. दोन दिवस जर माध्याह्नव्याप्ति असेल, तर पहिल्याच दिवसाची घ्यावी असे निर्णयसिंधूत सांगितले आहे व प्रदोषव्यापिनी घ्यावी असे कौस्तुभात म्हटले आहे. दोन दिवस जर प्रदोषव्यापिनी असेल अथवा प्रदोषकालाचा काही भाग जर व्याप्ति असेल, तर दुसर्याच दिवसाची घ्यावी. ज्यावेळी पहिल्या दिवशी फक्त प्रदोषव्याप्ति असून दुसर्या दिवशी मध्याह्नव्याप्ति असेल, त्यावेळी बर्याच शिष्टाचाराच्या अनुरोधाने प्रदोषव्याप्तीचीच वेळ घ्यावी आणि मध्याह्नव्याप्तीची घेऊ नये असे मला वाटते. या तिथीला काळभैरवाची पूजा करून त्याला तीन अर्घ्य द्यावे, आणि उपास व जागरण ही करावीत. याप्रमाणे अनन्तोपाध्यायांचे पुत्र काशीनाथोपाध्याय यांनी रचिलेल्या धर्मसिंधुसारातल्या कार्तिक महिन्याच्या कृत्यांचा उद्देश येथे संपला.