चतुर्दशी जर तीन प्रहरांच्या आधीच संपेल तर तिच्या अंती पारणे करावे. चतुर्दशी जर तीन प्रहरांहून अधिक असेल, तर चतुर्दशीतच पारणे करावे असे माधवादिकांचे सांगणे आहे. चतुर्दशी जर तीन प्रहरांच्या आतच संपत असेल, तर चतुर्दशीतच पारणे करावे. पारणे चतुर्दशीच्या अंती मुळीच करू नये; कारण चतुर्दशीत उपास व चतुर्दशीतच पारणे असा योग लक्षावधि पुण्यकर्मांनी येईल किंवा नाही से सांगवत नाही. 'पार्वति, त्याचे फळ प्रत्येक शिताला किती आहे हे मी सांगण्यास असमर्थ आहे.' वगैरे वचनांवरून चतुर्दशीत जर पारणे केले तर त्याचे मोठे पुण्य आहे, असे निर्णयसिंधूत जे सांगितले आहे, त्याची व्यवस्था पुढीलप्रमाणे जी समजावी ती अशी - नित्य कृत्य केल्यावर पारणा करता येईल इतकी जेव्हा चतुर्दशी नसेल तेव्हा, अथवा चतुर्दशीच्या शेष दिवशी ज्यांना दर्शादिश्राद्ध करणे योग्य होईल त्यांनी तिथीच्या अंती पारणे करावे. कारण, या ठिकाणी द्वादशीप्रमाणे नित्य कृत्याचा अपकर्ष (आधी करणे) करावा असे वाक्य नाही व तिथीच्या अंती पारणे करावे अशा प्रकारची विधायक वाक्ये असल्याने संकटकाळी जळपारणा करावी अशा विधिवाक्याची या ठिकाणी प्रवृत्ति नाही. नित्य कृत्य होण्यापुरती जर चतुर्दशी असेल व दर्शश्राद्ध करणे नसेल तर चतुर्दशीतच पारणे करावे.