आश्विन शुक्लपक्षात मूळनक्षत्री सरस्वतीदेवीचे आवाहन करून पूजा करावी. 'मूळनक्षत्री देवीची स्थापना, पूर्वाषाढानक्षत्री पूजन,
उत्तराषाढानक्षत्री बलिदान व श्रवणनक्षत्री विसर्जन करावे,' असे वचन आहे. त्याचप्रमाणे 'दररोज पूजा करावी' असे रुद्रयामलाचे
वचन आहे. यास्तव, मूळनक्षत्री
'आवाहनं तदङ्गभूतं पूजनंच करिष्ये'
असा संकल्प केल्यावर आवाहन व पूजन ही करावीत. पूर्वाषाढानक्षत्री
'पूजनं करिष्ये'
असा संकल्प करून आवाहनावाचूनच पूजा करावी. उत्तराषाढानक्षत्री
'बलिदानं तदङ्गभूतां पूजांच करिष्ये'
असा संकल्प करून, बलिदान व पूजा करावीत. श्रवणनक्षत्री
'विसर्जन कर्तुं तदड्गभूतां पूजां करिष्ये'
असा संकल्प करून, पूजा केल्यावर विसर्जन करावे. याप्रमाणे क्रम समजावा. या समयी मूळनक्षत्राचा पहिला चरण सूर्यास्तापूर्वी
सहा घटका व्याप्त असता, सरस्वतीचे आवाहन करावे. सहा घटिकांहून कमी व्याप्ति असल्यास, अथवा रात्री प्रथम चरण जर असेल
तर, विशेष वचन असल्यावाचून ती ग्राह्य नाहीत. यास्तव, दुसर्या इत्यादि चरणी दुसर्या दिवशीच आवाहन करावे. याप्रमाणे पूजा
इत्यादिकांकरिता पूर्वाषाढानक्षत्र इत्यादि दिवसास व्याप्त असेल तेच घ्यावे. विसर्जन मात्र श्रवणनक्षत्राच्या प्रथम चरणी मग तो
प्रथम चरण जरी रात्री असला तरी-त्याबाबतीत विशेष वचन आहे म्हणून- करावे. हे विसर्जन रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंतच करावे
असे मला वाटते.