आश्विनी पुनवेला कोजागरव्रत करावे, पुनव जर पूर्व दिवशीच निशीथव्यापिनी असेल तर तीच घ्यावी. व दुसर्या दिवशीच अथवा दोन्ही दिवशी जर निशीथव्यापिनी नसेल तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. पूर्वदिवशी निशीथ व्यापिनी व पुढच्या दिवशी प्रदोषव्यापिनी असा प्रसंग असता, दुसर्या दिवसाचीच घ्यावी असे काही ग्रंथकारांचे सांगणे आहे. या दिवशी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन, जागरण व द्यूतक्रीडा ही करण्यास सांगितली आहेत. पद्मासनावर बसलेल्या लक्ष्मीचे ध्यान करून अक्षतांच्या राशीवर 'ॐ लक्ष्मैनमः' या वाक्याच्या आवाहनाने पूजा केल्यावर
'नमस्ते सर्व देवांना वरदासि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्वदर्चनात् ॥
या मंत्राने पुष्पांजली द्याव्या व नमस्कार करावा.
'चतुर्दन्त समारूढो वज्रपाणिः पुरन्दरः ।
शचीपतिश्च ध्यातव्यो नानाभरणभूषितः ॥'
या मंत्राने इंद्राचे ध्यान करून अक्षतांच्या राशीवर 'इंद्राय नमः' म्हणून पूजा करावी, आणि मग
विचित्रैरावतस्थाय भास्वत्कुलिशपाणये ।
पौलोम्यालिङिताङ्गाय सहस्त्राक्षाय ते नमः ॥'
या मंत्राने पुष्पांजली देऊन नमस्कार करावा. मध्यरात्री, वर देणारी लक्ष्मी 'कोजागर्ति' (कोण जागते आहे) अशाप्रकारे प्रश्न विचारून
'तस्मैवित्त प्रयच्छामि अक्षैः क्रीडां करोति यः' (जो अक्षक्रीडा करतो आहे त्याला संपत्ति देईन) असे भाषण करते. देव आणि पितर यांना नारळ व पोहे अर्पण करून, आपण इष्टमित्रांसह खावेत. याच पुनवेला आश्वलायनांनी आश्वयुजी कर्म करावे. पर्व जर दोन प्रकारचे असेल तर -पूर्वाह्णसंधीत शेष पर्व असल्यास हे कर्म प्रकृति इष्ट करून करावे आणि अपराह्णसंधीत असल्यास विकृति इष्टि करून प्रकृति इष्टीचे अन्वाधान करावे. या बाबतीचा प्रयोग इतर ग्रंथात पहावा.