बारा महिन्यात येणारे जे व्यतिपातादि योग व भरण्यादि नक्षत्रे- यावर करण्याच्या श्राद्धांचा निर्णय, दर्शाप्रमाणेच अपराह्णव्याप्तीचा समजावा. या योगांवर उपास वगैरे करण्याचा विशेषसा परिपाठ नसल्याने त्याबद्दल येथे काहीच सांगितला नाही. चंद्रसंवत्सरांची नावे येणेप्रमाणे- प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापति, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानु, सुभानु, तारण, पार्थिव, व्यय, सर्वजित, सर्वधारी, विरोधी, विकृति, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलम्बी, विलम्बी, विकारी, शार्वरी, प्लव, शुभकृत, शोभकृत, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लङ्ग, कीलक, सौम्य, साधारण, विरोधकृत, परिधावी, प्रमादि, आनंद, राक्षस, अनल, पिंगल, कालयुक्त, सिद्धार्थी, रौद्र, दुर्मति, दंदुभि, रुधिरोद्गार, रक्ताक्षी, क्रोधन आणि क्षय. सूर्याच्या राशिसंक्रमणाप्रमाणे नक्षत्रसंक्रमणाच्या आधीच्या व पुढच्या सोळा घटका पुण्यकाळ असतो असे जाणावे.