पिता संन्यासी असल्यास अथवा पातित्याने युक्त असल्यास जीवत्पितृक पुत्राने देखील पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पिंडदानरहित असा सांकल्पविधि करून महालय करावा. कारण, "पिता संन्यस्त अथवा पतित असेल तर नांदीश्राद्ध व तीर्थश्राद्ध यांचे ठिकाणी पित्याने ज्यांचे श्राद्ध केले असते त्यांच्या उद्देशाने पुत्राने श्राद्ध करावे," "मुंडन, पिंडदान, सर्व प्रकारचे प्रेतकर्म, ही जीवत्पितृकाने आणि गर्भिणीपतीने करू नयेत" इत्यादि प्रकारची वचने आहेत. पिंडदान इत्यादि विस्ताराने करण्यास अशक्त असेल त्यानेही सांकल्पविधि करावा. सांकल्पविधीमह्ये अर्घ्यदान, समंत्रक आवाहन, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, "स्वधा वाचयिष्ये ॐ स्वधोच्यताम्" इत्यादि स्वधावाचन प्रयोग ही वर्ज्य करावी. अनेक ब्राह्मण न मिळतील तर देवाचे स्थानी शालिग्रामादिक देवमूर्तीची स्थापना करून श्राद्ध करावे. सर्वथा ब्राह्मण न मिळेल तर दर्भाचा बटु करुन श्राध करावे. पिता मृत झाला असता प्रथम वर्शी महालय कृताकृत आहे. महालय मलमासात करू नये. दुसर्या पक्षी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध प्राप्त झाले असता मृततिथीचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून दुसर्या तिथीचे ठिकाणी सकृन्महालय करावा. प्रतिपदेपासून दर्शापर्यंत दररोज महाल्य करण्याचा पक्ष असेल तर मृततिथीचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून निराळा पाक करून महालय करावा. अमावायेचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध व महालय प्राप्त होतील तर अगोदर प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून नंतर महालय आणि त्यानंतर दर्शश्राद्ध ही प्रत्येक प्रसंगी निराळा पाक करून करावी. अमावास्येचे दिवशी महालय प्राप्त होईल तेव्हाही याप्रमाणेच अगोदर महालय करून नंतर दर्शश्राद्ध करावे. मृततिथीचे दिवशी सकृन्महालय करण्याचे पक्षी त्या त्या तिथीच्या ग्राह्यत्वाचा निर्णय अपराह्णकालाच्या व्याप्तीच्या अनुरोधाने दर्शाचे निर्णयाप्रमाणेच घ्यावा असे मला वाटते. या दुसर्या पक्षी भरणीश्राद्ध केल्याने गयाश्राद्धाचे फल प्राप्त होते. भरणीश्राद्ध अपिंडक षड्देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे. काही लोक भरणीश्राद्ध पित्या इत्यादिकांच्या मरणोत्तर पहिल्या वर्षी मात्र करतात. दुसर्या इत्यादि वर्षी करीत नाहीत. याविषयी मूळ निर्णय शोधला पाहिजे. "जोपर्यंत एक वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत दैव अथवा पित्र्य कर्म करू नये." इत्यादि वचनावरून दर्शादि सर्व श्राद्धांचा पहिल्या वर्षी निषेध आहे. याकरिता एक वर्षे पूर्ण झाल्याम्तरच पितृत्व प्राप्त होते; म्हणून दुसर्या इत्यादि वर्शीच भरणीश्राद्ध करणे योग्य आहे असे मला वाटते. पित्याहून भिन्न जो जो कोणी मरण पावतो त्याचे त्याचे भरणीश्राद्ध पहिल्या वर्षी कोणी करतात त्याविषयीही काय आधार आहे तो मला समजत नाही. गयाश्राद्धाचे फळाच्या इच्छेने आचाराला अनुसरून करावयाचे असेल तर मृत माणसाच्या एकच त्रयीच्या उद्देशाने पार्वण करून देवांसहवर्तमान करावे. या श्राद्धामध्ये पिंडदान करण्याचा आचार आहे तोही चिंत्य आहे.