मंजिष्ठ, गजमद, केशर व रक्तचंदन ही पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात घालून जर स्नान केले, तर रविपीडा दूर होते. वाळा, शिरीष (तीळ), केशर व रक्तचन्दन यांच्या शंखोदकाने स्नान केल्यास चन्द्रपीडा दूर होते. खैर, देवदार, तीळ व आवळे ही रुप्याच्या भांड्यात घालून, त्या पाण्याने स्नान केल्याने मंगळ पीडा जाते. गजमद घातलेले संगमाचे पाणी मातीच्या भांड्यात घालून, त्याचे स्नान केल्यास बुधाची पीडा जाते. उम्बर, बेल, वड व आवळी यांची फळे सोन्याच्या भांड्यातल्या पाण्यांत घालून, त्याने स्नान केल्याने, गुरुपीडेचे शमन होते. गोरोचन, गजमद, बडीशेप व शतावरी ही रुप्याच्या पात्रांतील पाण्यात टाकून, त्याने स्नान केल्याने शुक्रपीडा नाहीशी होते. तीळ, उडीद, प्रियंगु (लांबट मिरे, केशर किंवा बायकांचा स्पर्श झाल्याने येणारी वेल, असे या शब्दाचे वर्णन आहे.) गंध व पुष्प ही लोखंडाच्या भांड्यातल्या पाण्यात घालून, त्याने स्नान केल्याने शनिपीडा जाते. गुग्गुळ, हिंग, हरताळ व मनशीळ या वस्तु घातलेल्या रेड्याच्या शिंगातल्या पाण्याने स्नान केल्यास, राहुपीडा जाते. डुकराने उकरलेली पर्वतशिखराची माती आणि मेंढीचे दूध यांनी मिश्रित केलेले पाणी तरवारीच्या म्यानात घालून, (खङ्गपात्र) त्याने स्नान केल्यास केतुपीडा जाते.