मघानक्षत्राने युक्त अथवा केवल त्रयोदशीचे दिवशी श्राद्ध नित्य आहे. केवल मघानक्षत्रीही श्राद्ध करावे. या श्राद्धविधीसंबंधाने बहुत ग्रंथात बहुत पक्ष आहेत. अपुत्र अथवा पुत्रवान अशा गृहस्थाश्रमी याने सपत्नीक पितृपार्वण व मातामहपार्वण यांसह चुलता, भ्राता, मामा, आत्या, मावशी, भगिनी, श्वशुर इत्यादिकांच्या पार्वणासह पिंडरहित असे सांकल्पविधीने श्राद्ध करावे. अथवा पिता व माता यांची दोन पार्वणे आणि महालयाप्रमाणे पितृव्य इत्यादि एकोद्दिष्ट गणांचे उद्देशाने सांकल्पविधीने श्राद्ध करावे. अथवा दर्शश्राद्धाप्रमाणे सहा देवतांचे उद्देशाने अपिंडक श्राद्ध करावे. अथवा निष्काव व पुत्रवान अशाने श्राद्धविधीने श्राद्ध करू नये, पण पितृत्रयी व मातृत्रयी अशी दोन पार्वणे केवल पितृव्य इत्यादिकांसहित उद्देशून
"एतेषां तृप्त्यर्थं ब्राह्मणभोजनं करिष्ये" असा संकल्प करून "पितृरूपिणे ब्राह्मणाय गन्धं समर्पयामि" इत्यादि पंचोपचार समर्पण करून उच्चार करून "ब्रह्मार्पण" इत्यादि पाठ म्हणून "अनेन ब्राह्मणभोजनेन पित्रादिरूपीश्वरः प्रीयताम्" असा उच्चार करून अन्नाचे उत्सर्जन करावे व खीर इत्यादि मधुर अन्नाने ब्राह्मणांना भोजन घालावे. दक्षिणा वगैरे देऊन त्यांचा संतोष केल्यानंतर स्वतः भोजन करावे, इतकाच प्रयोग करावा. अपुत्रिक व सकाम अशा गृहस्थाने पिंडदानरहित अशा श्राद्धविधीने श्राद्ध केले असता दोष नाही. अपुत्रिकाने पिंडदानही करावे असे क्वचित ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या सांगितलेल्या पक्षांपैकी एका पक्षाचा आश्रय करून मघात्रयोदशी श्राद्ध अवश्य करावे. कारण न केल्यास दोष सांगितला आहे, करिता हे श्राद्ध नित्य आहे. हस्तनक्षत्री सूर्य असता मघायुक्त त्रयोदशी आल्यास तिला गजच्छाया असे नाव आहे. या दिवशी श्राद्ध केले असता पुष्कळ फळ मिळते. या दिवशी महालय युगादि येतील तर
"मघात्रयोदशीमहालययुगादिश्राद्धानि तन्त्रेण करिष्ये" असा संकल्प करून सर्व श्राद्धे तंत्राने करावी. दर्शश्राद्धाने नित्य श्राद्धासारखी कोणत्याही श्राद्धाची प्रसंगसिद्धि होत नाहि. याविषयी मला असे वाटते- अंगभूत कर्मे एक असून प्रधानकर्मामध्ये भेद असणे याचे नाव तंत्र. विश्वेदेव, पाक इत्यादि अंगे सर्वांची एक आहेत करिता ब्राह्मण, अर्घ्य,पिंड इत्यादि अपरपक्षीय आहे म्हणून या ठिकाणी धूरिलोचनसंज्ञक विश्वेदेव घ्यावे असे श्राद्धसागरग्रंथामध्ये सांगितले आहे. एकत्र राहणार्या भ्रात्यांनी मघात्रयोदशी श्राद्ध प्रत्येकाने निराळे करावे असे निर्णयसिण्धु, कौस्तुभ इत्यादि ग्रंथात सांगितले आहे. विभक्त असले तथापि हे श्राद्ध सर्वांनी एकत्र करावे असे श्राद्धसागरग्रंथामध्ये सांगितले आहे.