आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्सद्वादशी (वसुबारस) म्हणतात. ही प्रदोषव्यापिनी घ्यावी. दोन्ही दिवस जर ही प्रदोषव्यापिनी नसेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी, कारण संध्याकाळ हा हिचा गौणकाळ असून त्या काळी तिची व्याप्ति आहे. ही जर दोन दिवस प्रदोषव्यापिनी असेल तर पहिल्या दिवसाचीच घ्यावी असे अनेक ग्रंथकारांचे जसे सांगणे आहे, तसेच दुसर्या दिवसाची घ्यावी असेही काही ग्रंथकार सांगतात. या तिथीला गोर्ह्यासारखाच जिचा रंग आहे अशा सवत्स (गोर्ह्यासह) गाईची पूजा करून, तिच्या पायावर तांब्याच्या अर्घ्याने जे अर्घ्य द्यावे, त्याचा मंत्र-
'क्षीरोदार्णवसम्भूते सुरासुरनमस्कृते ।
सर्वदेवमये प्रातर्गृहाणार्घ्य नमोस्तुते ॥
त्यानंतर उडदादिकांचे वदे त्या गाईला चारून,
'सर्वदेवमये देवि सर्वदेवैरलंकृते ॥
मातर्ममाभिलषितं सकलं कुरु नंदिनी ॥'
या मंत्राने तिची प्रार्थना करावी. त्या दिवशी तेलात तळलेले व थाळ्यात (पातेल्यात) शिजवलेले पदार्थ व गाईचे दूध, तूप, दही व ताक हे पदार्थ खाऊ नयेत. त्या दिवशी उडीद मिसळलेले अन्न खाऊन जमिनीवर निजावे आणि ब्रह्मचर्याने राहावे. याच द्वादशीला आरंभ करून पाच दिवस पर्यंतच्या पूर्वरात्री नीराजनविधि करावा असे नारदांनी सांगितले आहे. देव, ब्राह्मण, गाई, घोडे, वडील, थोर, लहान या सर्वांना, आई व इतर बायका यांनी ओवाळावे. अपमृत्यु टाळण्यासाठी त्रयोदशीच्या रात्रीच्या सुरवातीला घराबाहेर यमासाठी दिवा लावावा. याच त्रयोदशीला आरंभ करून तीन रात्रीचे गोत्रिरात्रव्रत करावे असे सांगितले आहे. त्याचा प्रयोग कौस्तुभात दिलेला आहे. (याच त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात.)