आवळीच्या वृक्षमूळी देवपूजेचा विधि
आवळीच्या वृक्षाचे मुळी सर्वपापक्षयद्वारा श्रीदामोदरप्रीत्यर्थ धात्रीमूले श्रीदामोदरपूजां करिष्ये असा संकल्प करून पुरुषसूक्ताने षोडशोपचार पूजा केल्यावर गंध, पुष्प व फल यांनी युक्त असे अर्घ्य द्यावे. अर्घ्याचा मंत्र -
"अर्घ्यं गृहाण भगवन्सर्वकामप्रदो भव ।
अक्षया संततिर्मेस्तु दामोदर नमोस्तु ते"
नंतर "अपराधसहस्त्राणि०" अशी प्रार्थना करून आवळीला कुंकू गंध इत्यादि अर्पण करून पुष्पांनी पूजन करावे. पूजेचे मंत्र - "धात्र्यै नमः शान्त्यै० मेधायै प्रकृत्यै० विष्णुपत्न्यै० महालक्ष्म्यै० रमायै० कमलायै० इन्दिरायै० लोकमात्रे० कल्याण्यै० कमनीयायै० सावित्र्यै० जगद्धात्र्यै० गायत्र्यै० सुधृत्यै० अव्यक्तायै० विश्वरूपायै० सुखपायै० अब्धिभवायै०
नंतर आवळीचे मूळाचे ठिकाणी सव्याने तर्पण करावे. त्याचा मंत्र -
पितापितामहश्चान्ये अपुत्रा ये च गोत्रिणः ।
ते पिबन्तु मया दत्तं धात्रीमूलेऽक्षयं पयः ॥
आब्रह्मस्तम्बपर्यन्तं०" याप्रमाणे तर्पण झाल्यानंतर
"दामोदरनिवासायै धात्र्यै देव्यै नमोऽस्तु ते ।
सूत्रेणानेन बध्नामि सर्वदेवनिवासिनीम् ॥'
हा मंत्र म्हणून आवळीला सूत्राचे वेष्टन करावे. नंतर "धात्र्यै नमः या मंत्राने चार दिशांचे ठिकाणी चार बलि देऊन आठ दीप लावावे. आठ वेळा वृक्षाला प्रद्कषिणा घालून नमस्कार करावा. व
"धात्रीदेवि नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि ।
पुत्रान्देहि महाप्राज्ञे यशो देहि बलंच मे ॥
प्रज्ञा मेधां च सौभाग्यं विष्णुभक्तिं च शाश्वतीम् ।
निरोगं कुरु मां नित्य निष्पापं कुरु सर्वदा ॥'
अशी प्रार्थना करून घृताने पूर्ण असे कांस्यपात्र सुवर्णासहित दान करावे. याप्रमाणे संक्षेप जाणावा.
रेवतीनक्षत्ररहित अशा कार्तिक शुक्ल द्वादशीचे दिवशी पारणा करावी. रेवतीनक्षत्र सर्व वर्ज्य करणे अशक्य असले तर चवथा पाद वर्ज्य करावा, इत्यादि विशेष श्रवणनिर्णयप्रकरणात सांगितला आहे तो पहावा.