वृश्चिक संक्रातीच्या पहिल्या सोळा घटकापर्यंतचा पुण्य काळ जाणावा. बाकीचा निर्णय मागे सांगितल्याप्रमाणेच समजावा. आता कार्तिकशुद्ध प्रतिपदेला करायची कृत्ये सांगतो. या तिथीला अभ्यंगस्नान जरूर करावे. त्याचप्रमाणे आश्विन वद्य चतुर्दशीपासून तीन दिवसपर्यंत रोज जर अभ्यंगस्नान केले नाही तर नरकादिकांच्या प्राप्तीचे दोष सांगितले असून, अभ्यंग केल्याने दारिद्र्यादिकांचा नाश होतो असेही सांगितले आहे. यावरूनच हा उत्सव नित्य व काम्य असा दोन प्रकारचा ठरतो. या प्रतिपदेला बलिपूजा, दीपोत्सव, गोक्रीडन, गोवर्धनपूजा, मार्गपालीबंध, गवताचा दोर ओढणे, नवीन वस्त्रादि धारण करणे, द्यूत, बायकांनी दिवे ओवाळणे, मंगलमालिका वगैरे कृत्ये करावीत. प्रतिपदा जर सूर्योदयाला लागून वीस घटका असेल, तर चंद्रदर्शन होत नाही, म्हणून चंद्रदर्सनप्रयुक्त अशा वेधाचा निषेध या दिवशी नसतो; यास्तव सारी कृत्ये या दुसर्या दिवसाच्या प्रतिपदेतच होतात. इष्टिनिर्णयप्रकरणात सहा घटका द्वितीयेचा प्रवेश प्रतिपदेलाच जर असेल तर चंद्रदर्शन होते, असे जे सांगितले आहे, ते स्थूलदर्शन होय. हे स्थूलदर्शन, द्वितीयेचा प्रवेश जर बारा घटकांचा असेल तरच होते; यास्तव येथे विरोध येत नाही, असे वाटते. प्रतिपदा सूर्योदयापासून फक्त आठ मुहूर्तच असून, पुढे नवव्या मुहूर्तात जर नसेल, तर बलिपूजा, गोक्रीडन, गोवर्धनपूजा, मार्गपालीबंधन व वष्टिकाकर्षण ही कृत्ये पूर्वविद्ध अशा प्रतिपदेलाच करावीत. अभ्यंग, नूतनवस्त्रादिधारण, द्यूत, स्त्रियांनी ओवाळणे व मंगलमालिका या गोष्टी सूर्योदयी मुहूर्तभर असणार्या प्रतिपदेलाच कराव्यात. बलिपूजन वगैरे गोष्टी जर काही कारणाने पूर्वविद्धा प्रतिपदेला करणे अशक्य असेल तर ते सर्व परविद्धा प्रतिपदेलाच करावे; पण कर्मत्याग न करिता, इतर तिथींवरही ती कृत्ये करू नयेत; जे बौधायनीय असतील अशांना जर त्यांच्या सूत्रात सांगितल्याप्रमाणे कर्म करणे अशक्य असेल, तर त्यांनी अपस्तंबादि सूत्रांत सांगितल्याप्रमाणे कर्म करावे, पण कर्मलोप न करिता, इतर शाखेप्रमाणेही वर्तन करू नये असा जो नियम आहे, त्याप्रमाणेच प्रतिपदेच्या बाबतीतही त्यांनी आचरण करावे, असा माधवाच्या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे. या दिवशी राजाने बळीचे दोन हातांचे पाच रंगात चित्र काढून, त्याची पूजा करावी, व इतरांनी पांढर्या तांदुळांची (बळीची) मूर्ति करून, तिची पूजा करावी. त्या पूजेचा मंत्र येणेप्रमाणे -
'बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुतप्रभो । भविष्येंद्रसुराराते पूजयं प्रतिगृह्यताम् ।'
बलिदानाच्या उद्देशाने थोडेसे जरी काहीही दान केले, तरी त्यामुळे विष्णूला अक्षय संतोष होतो. 'या प्रतिपदेला आनंद अथवा दुःख यापैकी जो कोणी ज्या भावाने राहातो, त्याचे हे मुनीश्वरा, त्याच भावाने वर्ष जाते. या दिवशी प्रभातकाळी सर्व माणसांनी द्यूतकर्म करावे. त्यात ज्याचा जय होईल त्याला सर्व वर्षभर जय मिळतो. या दिवशी अनेक पक्वान्ने करून पुष्कळ ब्राह्मणांसह भोजन करावे. बलिराजाच्या या दिवसात (नरक चतुर्दशीपासून चार दिवसपर्यंत) जो दिवे लावतो त्याच्या घरी लक्ष्मी नेहमी स्थिर राहते. दिव्यांनी ओवाळणे म्हणूनच याला दीपावली असे म्हणतात. बलिराजाच्या दिवसात जे दीपावली करीत नाहीत, त्यांच्या घरी हे केशवा, दिवे कसे लागले जातील? वगैरे वचन या बाबतीत आहेत.