ब्राह्मणाने उडीद मिसळलेले अन्न अथवा कोहळा यांचे बलिदान करावे. किंवा तुपाचे अथवा यवाच्या पिठाचे करावे. किंवा सिंह, व्याघ्र, मनुष्य, मेंढा वगैरेचा खड्गाने वध करावा. ब्राह्मणाने पशुमांस अथवा मद्यादिक यांचे बलिदान केल्यास, तो ब्राह्मण्यापासून भ्रष्ट होतो. सकाम अशा क्षत्रियांनीहि सिंह, वाघ, मनुष्य, मेंढा, डुक्कर, हरिण, पक्षी, मत्स्य, मुंगुस, घोरपड वगैरे प्राण्यांचा व आपल्या शरीरातील रक्त इत्यादिकांचा बलि द्यावा. कृष्णसार मृगाचा बलि क्षत्रियादिकांनी सुद्धा देऊ नये. या बलिदानाविषयींच्या मंत्रादिकांचा प्रकार निर्णयसिंधूत सांगितला आहे, तो पाहावा. शतचंडी व सहस्त्रचंडी यांचे या नवरात्रातले प्रयोग कौस्तुभग्रंथात पाहावे. जननाशौच अथवा मृताशौच असताहि नवमीला- होम, घट, देवता इत्यादिकांचे उत्थापन ब्राह्मणाकडून करवून, आपण पारणा करावी, आणि अशौच गेल्यानंतर ब्राह्मणभोजन, दक्षिणा इत्यादि करावे. याचप्रमाणे रजस्वलेनेहि पारणाकाली पारणा करून दानादिक शुद्धीनंतर करावीत. विधवेला रजोदर्शनात भोजनाचा निषेध सांगितला आहे. यास्तव तिने पारणादेखील शुद्धीनंतरच करावी. याचप्रमाणे इतर व्रताबद्दलहि समजावे. राजांनी प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत, सर्व लोहादिक शस्त्रांची स्थापना कराव, आणि छत्रचामरादि राजचिन्हे, हत्ती, घोडे वगैरे पशु, धनुष्यादि शस्त्रे, नगारे, दुंदुभी वगैरे वाद्ये या सर्वांची पूजा, होम वगैरे करावीत. घोडे बाळगणारे लोक जरी नसले, तरी त्यांनी स्वातीनक्षत्रयुक्त अशा प्रतिपदेला अथवा द्वितीयेला आरंभ करून नवमीपर्यंत वाजिनीराजनकर्म (घोड्याची पूजा, आरती वगैरे) करावे. यामध्ये उच्चैःश्रव्याची पूजा व रैवतपूजा प्रतिमांच्या ठिकाणी कराव्या. प्रत्यक्ष घोड्याची पूजा व आरती करावी. या दोन्ही कर्मांच्या पूजांचे मंत्र व होमादिकांचे मंत्र, यांचा खुलासेवार प्रयोग कौस्तुभात सांगितला आहे. सध्या घोडे बाळगणारे लोक विजयादशमीला आपल्या घोड्यांना स्नान घालून व पुष्पांच्या माळांनी श्रृंगारून, त्यांना अश्वशाळेत नेऊन (तबेल्यात) बांधतात. या ठिकाणी
'गंधर्वकुलजातस्त्वंमाभूयाः कुलदूषकः ।
ब्रह्मणः सत्यवाक्येन सोमस्य वरुणस्य च ॥
प्रभावाच्च हुताशस्य वर्धय त्वं तुरंगमान् ।
रिपून्विजित्य समरे सह भर्ता सुखी भव ॥
या मंत्रानी फक्त अश्वपूजाच करावी.