माघ शुद्ध अष्टमी ही भीष्माष्टमी होय. या तिथीवर जे कोणी श्राद्ध करतात, त्यांना संतति होते. या तिथीवरचे श्राद्ध काम्य असून तर्पण अवश्य आहे. तर्पण केल्याने एक वर्षाच्या पापाचा नाश होतो व न केल्याने पुण्यनाश होतो असे सांगितले आहे. या तिथीवर करण्याच्या तर्पणाचा मंत्र -
'वैयाघ्रपद्यगोत्राय सांकृत्य प्रवरायच गंगापुत्राय भीष्माय आजन्मब्रह्मचारिणे ॥
अपुत्राय जलं दद्मि नमो भीष्माय वर्मणे ।
भीष्मः शान्तनवो वीरः सत्यवादी जितेंद्रियः ॥
अभिरद्भिरवाप्नोतु पुत्रपौत्रोत्रोचितां क्रियाम् ॥
असे अपसव्याने तर्पण केल्यावर आचमन करून, सव्यानेजे अर्घ्य द्यावे त्याचा मंत्र-
वसूनामवताराय शान्तनोरात्मजाय च ।
अर्घ्यं ददामि भीष्माय आबाल्यब्रह्मचारिणे ॥
ज्याचा बाप जिवंत असेल त्याला तर्पणाचा अधिकार नाही असे कौस्तुभात जरी सांगितले आहे, तरी तसा अधिकार असल्याचे बरेच ग्रंथकार सांगतात. या कामाकरिता मध्याह्नव्यापिनी अष्टमी घ्यावी; कारण, श्राद्ध वगैरे एकोद्दिष्ट करावीत असे शास्त्र आहे.