या नवरात्रामध्ये घटस्थापना करावी. प्रातःकाळी, मध्याह्नी अथवा प्रदोषकाळी याप्रमाणे तीन वेळ, दोन वेळ अथवा एक वेळ आपल्या कुलदेवतेचे पूजन करावे. सप्तशत्यादिकांचा पाठ व जप करावा. अखंड दीप ठेवावा. आपल्या कुलाचाराप्रमाणे माळा बांधाव्या. उपवास, नक्त, एकभुक्त इत्यादि नियम पाळावेत. सुवासिनींना अथवा कुमारिकांना, कुळाचाराप्रमाणे पूजन भोजनादि द्यावे. शेवटच्या दिवशी सप्तशती वगैरे स्तोत्रमंत्राचा जप व होम ही कृत्ये करावीत, असे सांगितले आहे. काही कुळांत यापैकी घटस्थापना वगैरे दोन तीनच कर्मे करतात. सर्व करीत नाहीत. काही कुळात घटस्थापनेवाचून इतर काही करतात. काही कुळात सर्वच करतात. या कर्माचा समुच्चय (सर्व कर्मे करणे) अथवा विकल्प (काही कर्मे करणे) याची व्यवस्था ज्याने त्याने आपल्या कुलाचाराप्रमाणे समजावी. सामर्थ्य असले तरी, कुलपरंपरेने चालत आलेल्या कर्माहून कमी अधिक कर्मे करू नयेत असा शिष्टाचार आहे. फलाची जर कामना असेल, तर कुलाचार नसताही उपवासादि कर्मे करावीत. हे घटस्थापना रात्री करू नये. घटस्थापनेसाठी शुद्ध मृत्तिकेची वेदी करून, पंचपल्लव, दूर्वा, फल, तांबूल, कुंकुम, धूप, दीप इत्यादि सामुग्री जमवावी.