आश्विनी अमावास्येला सकाळी अभ्यंगस्नान, प्रदोषकाळी दीपदान व लक्ष्मीपूजन वगैरे कर्मे सांगितली आहेत. अमावास्या जर सूर्योदयव्यापिनी असून सूर्योस्तानंतर एक घटका असेल तर संशयाला जागाच नाही. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नानानंतर देवपूजादिक करून, अपराह्णकाळी पार्वणश्राद्ध करावे. प्रदोषकाळी दीपदान, उल्कादर्शन व लक्ष्मीपूजन ही करून मग जेवण करावे. या अमावास्येला लहान मुलांवाचून इतरांनी दिवसा जेवू नये, रात्री जेवावे असे विशेष वचन आहे. फक्त दुसर्याच दिवशी किंवा दोन दिवस जर प्रदोषव्यापिनी अमावास्या असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. आदल्या दिवशी जर प्रदोषव्यापिनी असेल, तर लक्ष्मीपूजनादिकांना तीच घेऊन, अभ्यंगस्नानादिकांना दुसर्या दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवशी जरी प्रदोषव्याप्ति नसली तरी हाच निर्णय समजावा. या बाबतीत पुरुषार्थचिंतामणीत असे सांगितले आहे की, आदल्या दिवशीच जर प्रदोषव्याप्ति असेल व दुसर्या दिवशी जर तीन प्रहरांहून अधिक अशी अमावास्येची व्याप्ति असेल, तर प्रतिपदा अमावास्येहून अधिक असल्यास लक्ष्मीपूजनादिक दुसर्या दिवशीच करावीत. यावरून दोन्ही दिवशी जरी प्रदोषव्यापिनी अमावास्या नसली तरी दुसर्या दिवशी साडेतीन प्रहरांहून अधिक अशी तिची व्याप्ति असते म्हणून दुसर्या दिवसाचीच घेणे योग्य ठरते असे वाटते. चतुर्दशीपासून तीन दिवसांना दीपावली (दिवाळी) असे नाव आहे. या तिहीत जो दिवस स्वातीनक्षत्राच्या योगाचा असेल तोच उत्तम होय. याच अमावास्येला मध्यरात्रीनंतर गावांतल्या बायकांनी अलक्ष्मीला (अकाबाईला) आपल्या अंगणातून बाहेर हाकून द्यावी. याप्रमाणे अनंतोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय त्यांनी रचिलेल्या धर्म सिंधुसार नावाच्या ग्रंथातल्या दुसर्या परिच्छेदातील आश्विनाच्या महिन्यातल्या कृत्यांच्या निर्णयाचा उद्देश येथे संपला.