मकर संक्रांत जर दिवसास असेल, तर संक्रांतीनंतरच्या चाळीस घटका तिचा पुण्यकाळ असतो. एक घटका वगैरे अल्पकाळ होय. दिवस संपण्याच्या वेळी जर संक्रमण होईल, तर तो संक्रांतीच्या जवळच्या अशा आधीच्या वेळी दिवसासच-स्नान, श्राद्ध, जेवण-ही करावीत, कारण रात्री श्राद्ध व दान यांचा निषेध सांगितला आहे.अल्पदिवसात श्राद्ध, दान व जेवण ही करणे अशक्य असते. रात्री भोजनाचा निषेध आहे, आणि या संक्रांतीला पुत्रवान अशा गृहस्थाश्रम्याला उपासाचा निषेध सांगितला आहे, यास्तव अशा प्रसंगी पुढचा पुण्यकाळ बाधित करून, मकरसंक्रांतीच्या अगोदरच पुण्यकाळ धरावा. रात्रीच्या पूर्वभागी, उत्तरभागी अथवा (मध्यरात्री) जर मकरसंक्रमण होत असेल, तर दुसर्या दिवशी जरी पुण्यकाळ असतो, तरी त्या दुसर्या दिवसाचा पूर्वार्ध जास्त पुण्यकारक असतो. व त्यापेक्षाही अधिक पुण्यकारक असा सूर्योदयानंतरच्या पाच घटकांचा काळ असतो. याप्रमाणेच रात्री संक्रमण होत असल्यास इतर संक्रमणांचेही जाणावे. जेथे पूर्व दिवशीच्या उत्तरार्धात पुण्यकाळ असेल, तेथे दिवसाच्या शेवटच्या भागाच्या पाच घटका अति पुण्यकारक असतात, आणि ज्यावेळी दुसर्या दिवशी पूर्वार्धी पुण्यकाळ असेल, त्यावेळी सूर्योदयानंतरचा पाच घटकांचा काळ फारच पुण्यकारक असतो असे समजावे. याप्रमाणे दिवसास संक्रमण असतांहि मकरापासून मिथुनापर्यंतच्या संक्रमणात, संक्रमणाच्या पुढच्या घटका पुण्यकाळ व कर्कापासून धनुपर्यंतच्या संक्रमणात आधीच्या घटका पुण्यकाळ असतो, असे समजावे. संक्रमणाच्या जितक्या जितक्या जवळच्या घटका, तितक्या तितक्या अधिक पुण्यकारक असतात, असे वचन आहे. सूर्यास्तानंतरचा तीन घटकांचा जो संध्याकाळ, त्याकाळी जर मकर संक्रमण झाले, तर दुसर्या दिवसाचे पुण्यत्व बाधित असल्यामुळे, पूर्वदिवशीच पुण्यत्व समजावे, असे जरी पुरुषार्थचिन्तामणीत सांगितले आहे, तरी ही गोष्ट धर्मशास्त्राच्या सर्व ग्रंथात सांगितलेली नाही.
'शुद्धपक्षातल्या सप्तमीला कोणतीही जरी सूर्यक्रान्ति होत असली, तरी ती ग्रहणापेक्षा अधिक होय.' या संक्रांतीला जे कर्म करायचे ते येणेप्रमाणे - रविसंक्रमणाचे जो कोणी स्नान करीत नाही, तो सात जन्मपर्यंत रोगी व दरिद्री होतो असे वचन आहे म्हणून, या दिवशीचे स्नान अवश्य आहे. तसेच अधिकारपरत्वे श्राद्ध करणेही अवश्य असल्याचे सांगितले आहे. हे श्राद्ध अपिण्डक करावे. हव्यकव्यदानादि जर संक्रांतीला केली, तर सूर्य ती करणाराला जन्मोजन्मी ती देतो. या संक्रांतीला उत्तरायण सुरू होत असल्याने ही एक अयनक्रांतीच आहे; यास्तव, तीन दिवस उपवास करावा, किंवा ज्या अहोरात्रात संक्रान्ति असेल, किंवा ज्या अहोरात्रात पुण्यकाळ असेल त्या अहोरात्रांत उपास करून, पुण्यकाळी-स्नान, दान वगैरे करावीत. हा उपास अपत्यवात् पुरुषाने करू नये. हे राजन, उत्तरायणांत तिळांची गाय करून तिचे दान करावे. व शिवालयात तिळेलाचे दिवे लावावेत तिळ व तांदूळ यांनी शिवाची विधिपूर्वक पूजा करावी. या दिवशी काळे तीळ अंगाला लावून, आत तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान करावे. तिळाचे दान, हवन व भोजन ही करावीत. पांढर्या तिळांनी देवादिकांचे तर्पण करून काळ्यांनी पितृतर्पण करावे. या दिवशी शिवाला जर तुपाचा अभिषेक केला, तर त्याचे मोठे फळ मिळते. या दिवशी तिळाने भरलेले तांब्याचे भांडे सुवर्णासह जे दान करावे, त्याचा प्रयोग पुढे सांगेन. या दिवशी शिवपूजाव्रत करावे, आदल्या दिवशी उपास करून संक्रमणाच्या दिवशी तिलोर्द्वतन, तिलस्नान व तिलतर्पण ही करावीत, व गाईच्या तुपाने शिवाचे मर्दन करावे, आणि शुद्धोदकाने धुऊन वस्त्रादि उपचारांनी पूजा केल्यावर सोने, हिरा, नीळ, पद्मराग व मोती, अशी पांच रत्ने किंवा आठ मासे सोने (शिवाला) अर्पण केल्यावर तिळाचे दिवे, सोने, अक्षता व तीळ यांनी पूजा करावी. तूप, कांबळा, चांदवा व चवरी ही नंतर (शिवाला) अर्पण केल्यावर, ब्राह्मणाला सुवर्णासह तीळ द्यावेत. तिळांचा होम केल्यावर ब्राह्मण व संन्यासी यांना जेवू घालून दक्षिणा द्यावी. व नंतर आपण तिलमिश्रित पंचगव्य घेऊन पारणे करावे. या दिवशी वस्त्रदान केल्यास मोठे फळ मिळते. तिळांसह बैल दान दिल्यास सर्व रोगांपासून मुक्तता होते. या दिवशी सूर्याला जर दुधाचा अभिषेक केला, तर सूर्यलोक मिळतो. विषुव (मेष व तुला) आणि अयन (कर्क व मकर) या संक्रांति जर दिवसास येतील, तर त्यांच्या आदल्या व पुढच्या दिवशी जसा अनध्याय असतो, तद्वतच या संक्रांति जर रात्री येतील, तर त्या संक्रमणाच्या रात्री, त्या रात्रीच्या आदल्या दिवशी व पुढच्या दिवशी अनध्याय असतो. संक्रमण जर रात्री होत असेल, तर ग्रहणात रात्री स्नान, दान वगैरे करावीत असे जरी कित्येकांनी लिहिले आहे, तरी ते सर्वशिष्टसंमत नाही. अयनदिवस व त्याच्या पुढचे करीचे दिवस हे शुभ कार्यांना वर्ज्य करण्यास सांगितले आहे. अर्धरात्रीच्या आधी जर अयनसंक्रमण होत असेल, तर तो व त्याच्या पुढचा दिवस वर्ज्य करावेत. मध्यरात्री अथवा मध्यरात्रीनंतर जर अयनसंक्रांत असेल तर तिच्या पुढचे दोन दिवस वर्ज्य करावेत असे मला वाटते. ग्रहणाचाही निर्णय असाच समजावा.