आतां पहिल्यांदां गर्भाधानविधि सांगतों. त्या विधींत उपयोगी असणार्या रजोदर्शनाच्या बाबतींतले जे वाईट महिने वगैरे त्यांचा निर्णय आतां आधीं सांगतों. चैत्र, ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद, कार्तिक व पौष हे महिने वाईट होत. प्रतिपदा, चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, अष्टमी, षष्ठी, द्वादशी व पौर्णिमा या तिथी अनिष्ट फल देणार्या आहेत. त्याचप्रमाणें-रविवार, मंगळवार व शनिवार हे वार; भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा व ज्येष्ठा हीं नक्षत्रें; विष्कम्भ, गण्ड,अतिगण्ड, शूल,व्याघात, वज्र, परिघाचें पूर्वार्ध, व्यतिपात व वैधृति हे योग; भद्रा, ग्रहण, रात्र, सन्धिकाल, अपराह्नकाल, निद्रावस्था, जुनें लुगडें, तांबडें, निळें, अथवा बेरंगी वस्त्र, नग्नपणा, दुसर्याचें घर व परगांव हीं सर्व वाईट होत. त्याचप्रमाणें रजोदर्शन जर थोडें, पुष्कळ किंवा निळ्या रंगाचें असेल तर त्याचें फळ अनिष्ट समजावें. केरसुणी, लाकडें, गवत, विस्तव, अथवा सूप यांपैकीं कोणतेंही हातीं असतांना जर रजोदर्शन होईल, तर ती कुलटा निघते. वस्त्रावर जर विषम (१-३-५-७-९ वगैरे) रक्तबिंदु असले तर ते पुत्रफल देणारे होत व सम असतील तर कन्याफल देणारे होत असें समजावें. पहिल्यांदाच विटाळशी (रजोदर्शन) झाल्यावर अक्षतांचें आसन करुन, त्यावर त्या (विटाळशी) स्त्रीला बसवावें व नवरा व मुलें असलेल्या, स्त्रियांनीं, तिला---हळद, कुंकू, गंध, पुष्पमाला, विडा वगैरे देऊन दिवे ओवाळावेत आणि उत्तम तर्हेच्या दिव्यांनीं सुशोभित केलेल्या घरांत तिला बसवावें. सुवासिनींना गन्धादि मीठ वगैरे द्यावींत.